राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना मतदारांच्या भावनेचा विचार करा : भाजप नेते आनंद रेखी

BJP leader Anand Rekhi,
BJP leader Anand Rekhi,

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
देशात घरगुती गॅस सिलेंडरचे दर हजार रुपयांवर पोहचले आहेत. बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी (१०० रू.) ओलांडली आहे. महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. त्यांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. अर्थव्यवस्था मंदावली असतानाही राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे मतदारांच्या भावनेचा विचार करा, असे आवाहन भाजप नेते आनंद रेखी यांनी विरोधकांसह स्वपक्षीयांना केले.

महाराष्ट्रात सध्या राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर करण्यात येणाऱ्या चिखलफेकीचा सर्वसामान्यांना काही एक फायदा होणार नाही. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे भान बाळगत सत्ताधारी, तसेच विरोधकांनी वागले पाहिजे. असंख्य मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी राजकीय आगपाखड बंद करीत, देशवासियांसाठी झटले पाहिजे, असेही रेखी म्‍हणाले.

महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना भोंगा, हनुमान चालीसा, अजान, हा व्हिडिओ लावा, तो व्हिडिओ लावा, ईडी, राजकीय हल्ले यात स्‍वारस्‍य नाही. यातून फारतर त्यांचे मनोरंजन होवू शकते; पंरतु सध्याच्या काळात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मतदारांकडे मनोरंजनाचाही वेळ शिल्लक नाही. अशात राजकीय पक्षांनी सामाजिक जबाबदारीचे भान बाळगत सर्वसामान्यांच्या मुद्याला हात घातला पाहिजे, असे आवाहन सर्वपक्षीयांना रेखी यांच्यावतीने करण्यात आले.

विकसनशील देशाला विकसित करण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत दिले जाते. विकास, शिक्षण, आरोग्याच्या याच मुद्द्यावर ऊन, पाऊस, थंडीत रांगेत उभे राहून मतदार मोठ्या विश्वासाने मतदान करतात. पंरतु, मतदानानंतर लोकशाहीत केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांचा राजकीय पक्षांना विसर पडतो. राजकीय पक्ष एकमेकांचे उणेदुणे असेच काढत राहीले, तर पुढच्या निवडणुकांवर मतदार बहिष्कार घालतील, ही शक्यता नाकारता येत नाही. अशी वेळ येवू नये म्हणून, सर्वसामान्यांना सतावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन रेखी यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news