West Bengal Bypoll : मुस्लिमबहुल रेजीनगरमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, 'नंदीग्राम'ही जिंकले

रेजीनगरमध्ये विरोधकांचे डिपॉझिट जप्त, नंदीग्राममध्ये काँग्रेसचा धुव्वा
West Bengal by Election
Published on: 
Updated on: 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले असून, येथे मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. हायव्होल्टेज ठरलेल्या नंदीग्राम आणि मुस्लिमबहुल रेजीनगर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाने (BJP) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे तब्बल ६५ ते ७५ टक्के मुस्लिम मतदार असलेल्या रेजीनगरमध्ये भाजपने विरोधकांचे सर्व राजकीय गणित उधळवून लावत ७५ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय खेचून आणला, तर नंदीग्राममध्येही १ लाख २२ हजार हून अधिक विक्रमी मताधिक्याने भगवा फडकावला.

देशभरातील ४ राज्यांमधील ६ जागांच्या (५ विधानसभा आणि १ लोकसभा) पोटनिवडणुकीचे निकाल आज (दि. ९) जाहीर झाले. यात सर्वांत मोठी राजकीय उलथापालथ पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाली.

रेजीनगरमध्ये भाजपचे ‘सरकार’ विजयी; विरोधकांचे डिपॉझिट जप्त

रेजीनगर हा मुस्लिमबहुल मतदारसंघ असल्याने संपूर्ण देशाची नजर या निकालावर खिळली होती. या जागेवर भाजपचे शंखरव सरकार, हुमायूं कबीर यांच्या 'एजेयूपी' (AJUP) पक्षाचे गुलाम नबी आझाद (रॉबिन), काँग्रेस, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस (TMC), बंडखोर तृणमूल गट आणि डावे पक्ष (CPI-M) अशी बहुकोनी लढत रंगली होती.

मतमोजणीअंती भाजपचे शंखरव सरकार यांनी तब्बल १,२९,९१४ मते मिळवत थेट ७५,८१६ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. हुमायूं कबीर यांचे चिरंजीव गुलाम नबी आझाद यांना केवळ ५४,०९८ मते मिळाली. येथे काँग्रेस, तृणमूल आणि डाव्यांची अक्षरशः दैना उडाली.

  • भाजप (शंखरव सरकार) : १,२९,९१४ मते (विजयी)

  • एजेयूपी (गुलाम नबी आझाद) : ५४,०९८ मते

  • काँग्रेस (अब्दुल्लाहिल काफी) : ६,१६८ मते (तिसरा क्रमांक)

  • टीएमसी - ममता गट (रबिउल आलम चौधरी) : ३,८४७ मते (चौथा क्रमांक)

  • सीपीआय(एम) (मोहम्मद सईद) : ३,७९७ मते

  • डेमोक्रॅटिक टीएमसी (सफियुझ्झमान शेख) : २,०४४ मते

रेजीनगरचा निकाल का ठरला अत्यंत धक्कादायक?

रेजीनगर विधानसभा मतदारसंघात ६५ ते ७५ टक्के मुस्लिम तर केवळ ३० ते ३५ टक्के हिंदू मतदार आहेत. सर्वसाधारण निवडणुकीत हुमायूं कबीर यांनी रेजीनगर आणि नाओदा या दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी नाओदा जागा कायम ठेवत रेजीनगरचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीत आपला मुलगा गुलाम नबी आझाद यांना मैदानात उतरवले. मात्र, विरोधकांमधील मतविभागणी आणि मतदारांनी भाजपला दिलेला अनपेक्षित पाठिंबा यामुळे राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत.

नंदीग्राममध्ये विक्रमी मताधिक्य; काँग्रेसचा धुव्वा

दुसरीकडे, राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नंदीग्राम मतदारसंघात भाजपने आपला बालेकिल्ला अबाधित राखला आहे. भाजपच्या उमेदवार हासीरानी रथ यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांचा १,२२,७५३ मतांच्या प्रचंड आणि ऐतिहासिक फरकाने पराभव करत विरोधकांचे पानिपत केले.

या दुहेरी विजयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजपचे पारडे प्रचंड जड झाले असून, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेससह संपूर्ण विरोधकांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news