

बलागड (पश्चिम बंगाल); वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बंगालमध्ये टीएमसीच्या सिंडिकेटमुळे सर्वसामान्यांना भाईपो टॅक्स (पुतण्या कर) भरावा लागत असून, या व्यवस्थेने स्थानिक उद्योगांचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप त्यांनी केला.
अमित शहा यांनी बलागडच्या पारंपारिक नौका बांधणी उद्योगाचा उल्लेख केला. ते म्हणाले, एकेकाळी या उद्योगाने अनेकांना रोजगार दिला होता, पण ममता बॅनर्जी यांच्या सिंडिकेट राजमुळे हा उद्योग संपुष्टात आला. त्यांच्या काळात 41 कारखाने बंद पडले. भाजपचे सरकार आल्यास हे कारखाने पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
“आज बंगालमध्ये सिमेंट खरेदी करायची असेल तरी भाईपो टॅक्स द्यावा लागतो. आता ममता बॅनर्जींना टाटा-बाय-बाय म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपचे सरकार येताच आम्ही सिंडिकेटवाल्यांना सरळ करू,“ असे शहा म्हणाले.
बंगालमधील घुसखोर तरुणांच्या नोकर्या हिसकावून घेत आहेत, असा आरोप करत त्यांनी घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आशुतोष मुखर्जी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ भव्य स्मारक उभारण्याची घोषणा त्यांनी केली.