

VHP Demands Garba for Hindus: विश्व हिंदू परिषदेने (VHP) नवरात्रीशी संबंधित अटी जारी केल्या आहेत. महाराष्ट्रातील 'गरबा' कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला पाहिजे आणि गैर-हिंदूंनी त्यात भाग घेऊ नये, यासाठी प्रवेशद्वारांवर आधार कार्ड तपासणी करावी, आदी अटींचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ही नियमावली समाजात तेढ निर्माण करणारी असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.तर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पोलिसांच्या परवानगीने कार्यक्रम आयोजित केला जात असेल तर आयोजकांना प्रवेशाच्या अटी घालण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषदेने (VHP) म्हटले आहे की, गरबा कार्यक्रम आयोजकांनी प्रवेशद्वारांवर आधार कार्ड तपासावेत आणि सहभागींना नाव लावायला सांगावे. कार्यक्रमात गरबा खेळण्यापूर्वी पूजाही सक्तीने करावी. विहिंप आणि बजरंग दलाचे सदस्य राज्यभरातील गरबा कार्यक्रमांवर सक्रियपणे लक्ष ठेवतील, असेही सांगण्यात आले आहे.
गरबा हा केवळ नृत्य नाही, तर देवीला प्रसन्न करण्यासाठीचा एक प्रकार आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमात केवळ धार्मिक विधींवर श्रद्धा असलेल्यांनाच सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर यांनी 'पीटीआय'ला सांगितले."विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते गरबा कार्यक्रमांवर लक्ष ठेवतील. ज्यांची देवीवर श्रद्धा नाही, त्यांनी त्यात सहभागी होऊ नये," असेही नायर यांनी म्हटले आहे.
विहिंपच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गरबा कार्यक्रमात कोणत्या अटींचे पालन व्हावे, याचा अधिकार आयोजन समितीचा असतो.
"मातेसमान असणाऱ्या देवीची आम्ही पूजा करतो. तिच्या कार्यक्रमावर अट लादणे चुकीचे आहे," असे शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.तर महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "विश्व हिंदू परिषद ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यातून त्यांना राजकीय फायदा मिळवायचा आहे."