

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: लिव्ह इन रिलेशनशिप टाळा, हिंदू तरुणांनी लवकर लग्न करावे आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा, असे अफलातून आवाहन विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) महाराष्ट्र, गोवा महामंत्री गोविंद शेंडे (Govind Shende) यांनी आज (दि.१८) पत्रकारांशी संवाद साधताना केले. अर्थातच या आवाहनामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
विश्व हिंदू परिषदेच्या प्रयागराज येथील कुंभमधील केंद्रीय बैठकीत महत्त्वपूर्ण प्रस्ताव पारीत करण्यात आले. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांचे हिंदूची लोकसंख्या वाढीचे मिशन सुरू झाल्याचे उघड झाले आहे. भारतातील लोकसंख्या असंतुलन हिंदूंच्या अस्तित्वासाठी घातक असून शिकेलेली मुलं उशीरा लग्न करतात, अपत्य लवकर होऊ देत नाहीत. झालंच तर एकच अपत्य जन्माला घालतात. यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. एकीकडे दुसऱ्या समाजाची लोकसंख्या वाढत असताना हिंदूंची लोकसंख्या तुलनेने कमी होत असल्याने संत समाज चिंतेत असल्याचे शेंडे म्हणाले.
असाच असमतोल राहिला तर येत्या काळात पुन्हा एकदा पाकिस्तानसारखी फाळणी होईल, किंवा बांगलादेशमध्ये सध्याची स्थिती आहे. अशी परिस्थिती भारतात निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. १९५१ साली देशात हिंदू ८५ टक्के होता, तो आता ७८ टक्के झाला आहे. हिंदू तरुणांनी व्यसनाधीनता सोडावी, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू नये, २.१ म्हणजे किमान तीन अपत्यांना जन्म द्यावा, असेही आवाहन शेंडे यांनी यानिमित्ताने केले आहे.