

Visakhapatnam Navy staffer kills woman
विशाखापट्टनम: नौदलातील एका जवानाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे समोर आली आहे. विवाहित असेलेल्या जवानाने केवळ हत्याच केली नाही, तर मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. तसेच शरीराचे काही भाग निर्जन स्थळी नेऊन जाळले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मोनिका (वय २९) असे मृत तरूणीचे नाव आहे. तर चिंतादा रवींद्र (वय ३५, रा. राजम, जि. विजयानगरम) असे आरोपी जवानाचे नाव असून तो 'आयएनएस डेगा' येथे कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हा विवाहित आहे. त्याचे मोनिकासोबत प्रेमसंबंध होते. २०२१ मध्ये एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर ते सातत्याने एकमेकांना भेटत होते.
गेले काही दिवस रवींद्रची पत्नी माहेरी गेल्याने सध्या तो घरी एकटाच राहत होता. रविवारी (दि. २९) दुपारी रवींद्रने मोनिकाला फोन करून घरी बोलावले. मोनिका त्याच्या घरी आल्यानंतर दोघांनी काही तास एकत्र घालवले. सायंकाळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात रवींद्रने मोनिकावर चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. त्यातील काही अवशेष पिशवीत भरून निर्जन ठिकाणी नेऊन जाळले. त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली.
रवींद्रने दिलेल्या जबाबानुसार, मोनिकाने त्याच्याकडून ३.५ लाख रुपये घेतले होते आणि ती त्यांच्या संबंधांबाबत त्याच्या पत्नीला सांगण्याची धमकी देत होती. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात रवींद्रने मोनिकाचे तोंड दाबून तिची गळा आवळून हत्या केली.
हत्येचा पुरावा मिटवण्यासाठी रवींद्रने अत्यंत क्रूर पाऊल उचलले. त्याने ऑनलाइन चाकू मागवला. त्याने मोनिकाच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. तर हात आणि डोक्याचा भाग आदिवीवरम येथील एका निर्जन भागात नेऊन जाळला.