

Petrol pump fire:
रायपूर: पेट्रोल भरताना सिगारेट ओढण्यास मनाई करणे एका तरुणाला इतके झोंबले की, त्याने रागाच्या भरात चक्क लायटरने पेट्रोल पंपाच्या नोझललाच आग लावली. या संतापजनक कृत्यामुळे पेट्रोल पंपावर भीषण आग भडकली, मात्र कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा स्फोट टळला. छत्तीसगडमधील रायपूर येथील उरला परिसरात गुरुवारी संध्याकाळी ही थरारक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र क्षत्री आणि इम्रान हे दोन तरुण आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी उरला येथील पंपावर आले होते. इम्रान दुचाकीवर बसला होता, तर धर्मेंद्र शेजारी उभा होता. पेट्रोल भरण्यासाठी जसे टाकीचे झाकण उघडले, तसे धर्मेंद्रने खिशातून सिगारेट काढून ती पेटवण्याचा प्रयत्न केला. पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रोखले आणि तिथे धूम्रपान करणे धोक्याचे असल्याचे सांगितले.
या साध्या सूचनेमुळे धर्मेंद्रचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात आपले लायटर काढले आणि थेट गाडीत पेट्रोल भरत असलेल्या नोझलला लावले. क्षणात पेट्रोलने पेट घेतला आणि भीषण आगीच्या ज्वाळा भडकल्या.
आग लागताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा दुचाकीच्या टाकीपर्यंत आणि मुख्य मशीनपर्यंत पोहोचल्या होत्या. आगीचा भडका उडताच दोन्ही आरोपी आणि आजूबाजूचे लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. आगीचे काही थेंब आरोपीच्या अंगावरही उडाल्याने तो किरकोळ भाजला.
मोठा स्फोट होण्याची भीती असतानाही पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी पळून न जाता प्रसंगावधान दाखवले. एका कर्मचाऱ्याने तातडीने मुख्य इंधन पुरवठा बंद केला आणि पेटता पाईप बाजूला ओढला. त्यानंतर पंपावर असलेल्या अग्निशमन उपकरणांचा वापर करून काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे.