

Viral video girlfriend slaps boyfriend
नवी दिल्ली : प्रेमात सगळं काही माफ असतं म्हणतात, पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये दिसणारं दृश्य काहीतरी वेगळंच सांगतंय! या व्हिडिओमध्ये रागाचा पारा वाढलेली गर्लफ्रेंड आपल्या प्रियकरावर एकापाठोपाठ एक कानशिलात लगावताना दिसत आहे. हा राडा नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट नसले तरी व्हायरल होणारा हा 'हाय व्होल्टेज ड्रामा' पाहून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महिला खरोखरच दयाळू असतात का? असा खोचक सवालही एका नेटकर्याने केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी दुचाकीच्या पार्किंग परिसरात उभे असल्याचे दिसते. सुरुवातीला त्यांच्यात काहीतरी संवाद सुरू असतो; पण अचानक दुचाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडची सटकते आणि तिचा रागाचा पारा चढतो. कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता ती तरुणी एका मिनिटाच्या आत प्रियकराच्या कानशिलात तब्बल ७ वेळा लगावते. विशेष म्हणजे इतका मार खाऊनही तो तरुण शांतपणे उभा असतो आणि कोणताही प्रतिकार करत नाही.
हे नाट्यमय दृश्य पाहून घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ती तरुणी तिथे उपस्थित असलेल्या बघ्यांनाच उलट उत्तर देते आणि मोठ्या धिटाईने म्हणते, "हवं तर पोलिसांना बोलवा!" या घटनेमुळे तिथे उपस्थित असलेले नागरिकही अवाक झाले.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, "या मुलीने तिच्या प्रियकराला लोकांसमोर अनेकवेळा कानशिलात लगावली. ती मुलगी असल्यामुळे त्या निष्पाप तरुणाला वाचवण्याची हिंमत एकाही पुरुषाने दाखवली नाही. विचार करा, जर हीच गोष्ट उलट असती (म्हणजे मुलाने मुलीला मारले असते) तर किती मोठा गदारोळ झाला असता. महिला खरोखरच दयाळू असतात का?" असा सवालही त्याने केला आहे.