

Viral News
बेंगळूरू : देवाच्या दर्शनाला जाणे एका बेंगळूरूतील आयटी अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. दक्षिण बेंगळूरूतील श्री गणेश मंदिराबाहेरून त्याचे १६,००० रुपये किमतीचे ब्रँडेड बूट अवघ्या पाच मिनिटांत चोरीला गेले. मंदिरांबाहेर अशा चोऱ्या होणे सामान्य गोष्ट असल्याचे म्हणत बूट चोरीचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली, पण अभियंत्याने आग्रह धरल्याने तक्रार दाखल केली.
गिरिनगर येथील रहिवासी असलेल्या या सॉफ्टवेअर अभियंत्याने पोलिसांना सांगितले की, ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.२० ते ७.२५ या वेळेत त्याचे केवळ सहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेले बूट चोरीला गेले. त्याने आपले ब्रँडेड बूट घातले होते आणि तो मोटारसायकलवरून मंदिरात गेला होता. त्याने आपली बाईक पार्क केली आणि इतर भाविकांनी जिथे चप्पल-बूट काढले होते, तिथेच त्याने आपले बूट ठेवले.
फक्त पाच मिनिटांत पूजा करून तो बाहेर आला, तेव्हा त्याला त्याचे बूट जागेवर दिसले नाहीत. त्यानंतर त्याने मंदिर व्यवस्थापन आणि पुजाऱ्यांशी संपर्क साधला. पण मला कळले की मंदिरात ही सामान्य समस्या आहे. चोरांनी तर पुजाऱ्यालाही सोडले नाही, त्यांच्या चपलाही गेल्या दोनदा चोरीला गेल्या आहेत. अनेक भाविकांनीही त्यांच्या चपला हरवल्याचे अनुभव सांगितले. पण, त्यापैकी कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. मला अशा घटनांकडे दुर्लक्ष करायचे नव्हते."
"या लहान गुन्ह्यांकडे दुर्लक्ष नको," असे म्हणत, आयटी अभियंत्याने पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा आग्रह केला. सुरुवातीला चप्पल चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना अखेरीस तक्रार दाखल करावी लागली.
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजमध्ये तो अनवाणी पायांनी भाविकाचा आव आणत मंदिरात येतो आणि जाताना अभियंत्याचे बूट घालून पळताना दिसत आहे.
यापूर्वी पकडलेल्या काही चोरांनी पोलिसांना सांगितले होते की, ते चोरीच्या चपला केवळ २० ते ५० रुपयांना विकतात आणि त्यातून येणाऱ्या पैशातून दारू पितात.