

Vietnam Boat Accident : व्हिएतनामच्या दक्षिण किनारपट्टीवर पर्यटकांची स्पीडबोट उलटून झालेल्या भीषण अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. फु कुओक (Phu Quoc) बेटाजवळ शनिवार दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी व्हिएतनाम पोलिसांनी स्पीडबोटच्या कॅप्टनला ताब्यात घेतले आहे.
शनिवारी (दि. ११ जुलै) दुपारी फु कुओक जवळील 'हॉन मे रुत न्गोई' बेटावरून निघालेली ही स्पीडबोट किनाऱ्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असताना उलटली. या बोटीमध्ये ३२ भारतीय पर्यटक आणि व्हिएतनामचे ४ क्रू मेंबर्स (कर्मचारी) होते.'द असोसिएटेड प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, ५७ वर्षीय कॅप्टन न्गुयेन होंग हाय (Nguyen Hong Hai) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जलवाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याची चौकशी केली जात असल्याचे व्हिएतनामच्या सरकारी माध्यमांनी सांगितले.
रिपोर्टनुसार, हे सर्व पर्यटक भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी 'लावा इंटरनॅशनल' कडून आयोजित करण्यात आलेल्या एका ट्रिपसाठी आले होते. कंपनीने आपल्या कर्मचारी, वितरक (डिस्ट्रिब्युटर्स) आणि रिटेल पार्टनर्ससाठी ही विशेष ट्रिप आयोजित केली होती. लावा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्यांमध्ये १४ चॅनल पार्टनर्स आणि एका कंपनी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमधील रहिवासी होते.
हनोई येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातातून वाचलेल्या १६ पर्यटकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते भारतात परतत आहेत. तर एका जखमी पर्यटकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. सर्व मृतदेह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतात आणण्यासाठी सध्या हो ची मिन्ह सिटी येथे पाठवले जात आहेत.
अपघातानंतर जवळपास डझनभर बोटी बचावकार्यासाठी धावून आल्या. मात्र, समुद्रातील प्रचंड खवळलेल्या लाटा आणि ३ मीटरपर्यंत उंच उडणाऱ्या लाटांमुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत होते. नंतर जेट स्कीच्या (Jet Skis) मदतीने वाचलेल्या प्रवाशांना किनाऱ्यावर आणण्यात आले. सरकारी माध्यमांच्या अहवालानुसार, प्रवाशांना प्रवासापूर्वी लाईफ जॅकेट घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु अपघात झाला तेव्हा अनेकांनी ते अंगात घालण्याऐवजी हातामध्ये पकडले होते. बोट उलटल्यानंतर काही प्रवासी बोटीच्या आतच अडकले होते, त्यांनी खिडक्या आणि बोटीच्या समोरील भागातून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला.