Moshi Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेला ६० तास उलटले; सहा कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध नाही, जबाबदारीवरून आरोप-प्रत्यारोप

NDRF, लष्कर आणि अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू; कचऱ्याच्या डोंगरालगत इमारत उभारण्यावर प्रशासनाला सवाल
Moshi Accident
Moshi AccidentPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा डोंगर ढासळून इमारत जमीनदोस्त झाल्याप्रकरणी बचावकार्याला ६० तासांहून अधिक कालावधी उलटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा कर्मचाऱ्यांचा शुक्रवार (दि. १०) रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय लष्कर, महापालिकेचे अग्निशामक दल आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असतानाच या दुर्घटनेला जबाबदार कोण? यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

Moshi Accident
Moshi Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून आरोप-प्रत्यारोप; ‘नैसर्गिक आपत्ती’चा दावा करणाऱ्या अहवालावर प्रश्नचिन्ह

दुर्घटनेत एकूण २३ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शुक्रवार (दि. १०) रात्री उशिरापर्यंत उर्वरित आठ जणांचा शोध सुरू होता. दरम्यान, बचावपथकला दोनजण बेशुद्ध अवस्थेत दिसले होते. घटनास्थळी सुमारे १२ पोकलेनसह अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू असून, आणखी दहा यंत्रे मागविण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माध्यमांना दिली.

Moshi Accident
Moshi Garbage Depot: बापरे ! कचऱ्याचा डोंगर ३५ वर्षांपासून; कचरा एकाच ठिकाणी साचला

दरम्यान, बचावकार्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. इमारतीचे दोन स्लॅब एकमेकांवर कोसळल्याने थेट प्रवेश करणे धोकादायक ठरत आहे. तसेच, परिसरात मिथेन व क्लोरिन वायूचे प्रमाण वाढल्याने जवानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरा बाजूला करून इमारतीच्या मागील बाजूने सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम सुरू केले आहे. एनडीआरएफच्या तांत्रिक सूचनांनुसारच बचावमोहीम राबविली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Moshi Accident
Moshi Accident: मोशी दुर्घटनेमुळे पोलिसांवर तिहेरी ताण; बचावकार्य, वाहतूक नियंत्रण आणि पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी

दरम्यान, दुर्घटनेच्या कारणांवरून प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कचऱ्याच्या डोंगरापासून अवघ्या ३० ते ५० फूट अंतरावरच इमारत उभारण्यास परवानगी कशी देण्यात आली, सुरक्षा भिंत नसतानाही पूर्णत्व प्रमाणपत्र का देण्यात आले, तसेच दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. आयुक्तांनी या घटनेला नैसर्गिक आपत्ती म्हटल्यानेही वाद निर्माण झाला आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर त्रयस्थ यंत्रणेमार्फत संरचनात्मक तपासणी करून सखोल चौकशी केली जाईल व दोषींवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी माध्यमांना सांगितले आहे.

या दुर्घटनेचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही सुरू केला आहे. एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूस कारणीभूत ठरलेला निष्काळजीपणा अथवा इतर बाबींचा सर्वंकष तपास केला जात आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Moshi Accident
Moshi Accident: धीर सोडू नका; प्रशासन तुमच्या पाठीशी; आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी साधला नातेवाईकांशी संवाद

दुर्घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी कचऱ्याच्या डोंगराची उंची निर्धारित मर्यादेपेक्षा वाढल्याचा आरोप करत प्रकरणाची न्याय्य चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेवकांनी पालिका आयुक्तांच्या दालनात ­आंदोलन करत पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि विजय आल्हाट यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन डोंगरालगत इमारती उभारणे चुकीचे असल्याचे सांगत व्यवस्थापनातील त्रुटींवर बोट ठेवले. बचावकार्य सुरू असताना अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढत असून, दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे.

मोशी येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यामागे निष्काळजीपणा किंवा अन्य कोणाची जबाबदारी आहे का, याचा सखोल तपास केला जात आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आजही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या आहेत.

मारुती जगताप, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news