

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचे काम आणि तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी दिली. लवकरच निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकते. राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार, भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ६६(१) नुसार, उपराष्ट्रपतींची निवड राज्यसभा आणि लोकसभेचे सर्व खासदार करत असतात, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, १९७४ च्या नियम ४० नुसार, निवडणूक आयोगाला खासदारांची अद्ययावत यादी आणि त्यांचे नवीनतम पत्ते तयार करून ठेवणे अनिवार्य असते. त्यानुसार, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणूक, २०२५ साठी मतदारांची यादी अंतिम केली आहे, असे आयोगाने सांगितले. खासदारांची नावे त्यांच्या संबंधित सभागृहाच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार वर्णक्रमानुसार मांडणी करून एकाच क्रमाने सूचीबद्ध केली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. दरम्यान, जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आरोग्याचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही निवडणूक होणार आहे.