

uttar pradesh keshav prasad mauryas helicopter emergency landing at lucknow airport
लखनऊ : पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आज एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. लखनऊहून कौशांबीकडे जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टरमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे तातडीने लखनऊमधील (अमौसी विमानतळ) येथे आपत्कालीन लँडिंग करावी लागली. वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठा अपघात टळला आणि उपमुख्यमंत्री सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
या विषयी अधिक माहितीनुसार, उपमुख्यमंत्री लखनऊमधील ला मार्ट्स (La Marts) मैदानातून कौशांबीकडे जाण्यासाठी रवाना झाले होते. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये अचानक धूर भरू लागला आणि डिस्प्ले अचानक बंद झाला. त्यामुळे आत बसलेल्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली.
स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पायलटने तात्काळ लखनऊ एटीसीशी संपर्क साधला आणि अमौसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी मागितली. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
हेलिकॉप्टर जमिनीवर उतरल्याबरोबर सुरक्षा आणि तांत्रिक पथकांनी त्याला वेढा घातला आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासात ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत तांत्रिक तज्ज्ञांची टीम सविस्तर चौकशी करत आहे.