

masterchef india 2026 winners ajinkya gandhe vikram gandhe know all about them and prize money
पुढारी ऑनलाईन :
'मास्टरशेफ इंडिया 2026' मध्ये अंजिक्य गंधे आणि विक्रम गंधे यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. यंदाच्या सिझनमध्ये पहिल्यांदाच जोडीच्या फॉरमॅटमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती आणि ही स्पर्धा जिंकणारी पहिली जोडी म्हणून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. अंजिक्य आणि विक्रम यांना २५ लाख रुपये, ट्रॉफी आणि गोल्डन एप्रन असे बक्षीस मिळाले. चला जाणून घेऊया या दोन्ही भावांबद्दल सविस्तर माहिती.
६ मार्च रोजी या कुकिंग शोचा ग्रँड फिनाले पार पडला. नागपूरचे दोन भाऊ – विक्रम गंधे आणि अंजिक्य गंधे यांनी ही स्पर्धा जिंकली. शोमध्ये ते ‘गंधे ब्रदर्स’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. ‘मास्टरशेफ इंडिया’चा किताब जिंकताना त्यांना ट्रॉफीसोबत गोल्डन एप्रन आणि २५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. या सिझनमध्ये पहिल्यांदाच जोडी फॉरमॅट आणण्यात आला होता आणि हा किताब जिंकणारी पहिली स्पर्धक जोडी म्हणून त्यांनी इतिहास घडवला.
इतर स्पर्धकांना टाकले मागे
विक्रम आणि अंजिक्य गंधे यांनी भारतीय पारंपरिक चवीला आधुनिक टच देत उत्कृष्ट पदार्थ सादर केले. त्यांच्या या अनोख्या डिशेसने तिन्ही परीक्षक संजीव कपूर, रणवीर बरार आणि कुणाल कपूर यांना प्रभावित केले. त्यांनी अंतिम फेरीत चंदना आणि सैश्री रचाकोंडा या रनर-अप जोडीला पराभूत करत ‘मास्टरशेफ इंडिया 2026’ची ट्रॉफी जिंकली.
नागपूरच्या गंधे ब्रदर्सची कामगिरी
विक्रम आणि अंजिक्य गंधे हे महाराष्ट्रातील नागपूरचे रहिवासी आहेत. दोन्ही भाऊ ‘गंधे ब्रदर्स’ म्हणून ओळखले जातात. लहानपणापासूनच दोघांनाही स्वयंपाकाची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
अंजिक्य गंधे हे व्यावसायिकदृष्ट्या आर्किटेक्ट आहेत. त्यांनी या क्षेत्रात प्रशिक्षण घेतले होते, पण खाद्यपदार्थांबद्दलचा त्यांचा उत्साह वाढतच गेला. त्यामुळे त्यांनी गोव्यात जाऊन फूड क्षेत्रात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
दोघा भावांनी कुकिंग व्यवसायात आजमावले नशीब
अंजिक्यने गोव्यात २४ व्या वर्षी स्वतःचा कॅफे सुरू केला. पुढे तो कॅफे यशस्वी व्यवसायात बदलला. नंतर मोठा भाऊ विक्रम गंधेही त्यांच्यासोबत या व्यवसायात सहभागी झाला. मात्र विक्रमने अंजिक्यच्या आधीच कुकिंगची वाट निवडली होती. त्यांनी अवघ्या १९ व्या वर्षी स्वतःची कॅन्टीन सुरू केली होती.
दोन्ही भावांनी एकत्र सुरू केला व्यवसाय
यानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्यांनी नागपुरात ‘प्लेस बेकहाउस’ नावाचे कॅफे व रेस्टॉरंट सुरू केले. सध्या ते दोघे मिळून हा व्यवसाय चालवतात. त्यांच्या खास आणि वेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना खूप आवडतात.