

UPSC Prelims Exam 2025
यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा २०२५ ची तारीख जवळ येत आहे. यंदा केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही परीक्षा २५ मे रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार आता ॲडमिट कार्ड येण्याची वाट पाहत आहेत. या परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेवर (सीएसई) देखील होऊ शकतो. यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा २५ मे २०२५ रोजी होणार आहे. सध्याची तणावाची परिस्थिती पाहाता जर यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलण्यात आली, तर यूपीएससी त्यांची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्याबाबतची सूचना जारी करेल.
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाने बेंचमार्क दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती/दिव्यांगत्व व्यक्ती (PwBD/PwD) श्रेणीतील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे, ज्यांनी आगामी प्रिलिम्स परीक्षेसाठी स्क्राइबची सुविधा घेण्याचा पर्याय निवडला आहे.
यूपीएससीने जारी केलेल्या नोटिशीनुसार, ज्या PwBD उमेदवारांनी स्क्राइबचा पर्याय निवडला आहे ते प्रिलिम्ससाठी त्यांचे स्क्राइब बदलू शकतात. त्यासाठी त्यांनी १८ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांचा विनंती अर्ज सादर करायचा आहे.
यूपीएससी सीएसई प्रिलिम्स परीक्षा २५ मे २०२५ रोजी होईल. ही परीक्षा अनुक्रमे पेपर १ आणि पेपर २ अशा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. शिफ्ट वेळा खालीलप्रमाणे आहेत.
पेपर १ (शिफ्ट १) : सकाळी ९.३० ते ११.३० पर्यंत
पेपर २ (शिफ्ट २) : दुपारी २.३० ते ४.३० पर्यंत
यावर्षी, आयोगाकडून नागरी सेवा परीक्षेद्वारे ९२९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भारतीय वन सेवेतील पदांसाठी एकूण १५० रिक्त जागा आहेत.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) अंतिम परीक्षांचे उर्वरित पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत. याबाबत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया - ICAI ने म्हटले आहे आहे की, "सध्याची तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, सीए फायनल, इंटरमीडिएट आणि PQC परीक्षेचे इंटरनॅशनल टॅक्सेशन-असेसमेंट टेस्ट (INTT AT) चे ९ मे ते १४ मे २०२५ दरम्यान होणारे उर्वरित पेपर्स पुढे ढकलण्यात आले आहेत."