

Operation Sindoor India Pakistan Tensions
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर संघर्ष वाढला आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. ऑपरेशन सिंदूर अजून सुरु आहे. दरम्यान, पाकिस्तान आपले सैन्य फॉरवर्ड भागात हलवत आहे, असे परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पाकिस्तान आपले सैन्य सीमेजवळ हलवत असल्याने भारतीय सैन्य अधिक सज्ज आणि सतर्क झाले आहे.
"पाकिस्तान त्यांचे सैन्य सीमेजवळ हलवत असल्याचे दिसून आले आहे. यातून तणाव वाढविण्यासाठी त्यांचा आक्रमक हेतू दिसतो. भारतीय सशस्त्र दल उच्च ऑपरेशनल तयारीच्या स्थितीत आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.," असे विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले.
व्योमिका सिंह पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानकडून भारतीय एस-४०० प्रणाली नष्ट केल्याचे आणि सुरत आणि सिरसा येथील हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचे दावे करून सतत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानने केलेल्या या खोट्या दाव्यांचे भारत स्पष्टपणे खंडन करतो.
"पाकिस्तानी सैन्याकडून पश्चिम सीमेवर सतत हल्ले सुरु आहेत; त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला. पण भारताने त्याचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांनी उधमपूर, भूज, पठाणकोट, भठिंडा येथील हवाई दलाच्या तळांवरील उपकरणांचे नुकसान आणि जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहाटे १:४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला," असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
"पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांवरील हॉस्पिटल्स आणि शाळा इमारतींना लक्ष्य केले. यातून पुन्हा एकदा त्यांची नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची कृती उघड झाली. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे'', असेही त्या म्हणाल्या.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले, "पाकिस्तानची कृती चिथावणीखोर आणि तणाव वाढवणारी आहे. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे."