

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक डिजिटल पेमेंटला घाबरतात का? किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना पॉकेटमनीसाठी सुरक्षितपणे पैसे द्यायचे आहेत का? या सर्व समस्यांवर उपाय म्हणून ‘एनपीसीआय’ भीम सर्व्हिसेस लिमिटेडने एक नवीन आणि अत्यंत उपयुक्त ‘यूपीआय सर्कल’ फुल डेलिगेशन फिचर लाँच केले आहे.
या फिचरमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा विश्वासू व्यक्तींना थेट तुमच्या बँक खात्यातून ‘यूपीआय’ पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकता. विशेष म्हणजे, यासाठी पेमेंट करणाऱ्या व्यक्तींचे स्वतःचे बँक खाते असण्याचीही गरज नाही. हे फिचर दरमहा 15,000 रुपयांच्या मर्यादेसह येते. म्हणजेच, तुम्ही ज्या व्यक्तीला परवानगी द्याल, ती व्यक्ती तुमच्या खात्यातून महिन्याला 15,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकणार नाही.
काय आहे ‘यूपीआय सर्कल’ आणि ते कसे काम करते?
‘यूपीआय सर्कल’ फिचर वापरून मुख्य वापरकर्ता आपल्या कोणत्याही विश्वासू व्यक्तीला सेकंडरी यूजर बनवू शकतो. यानंतर सेकंडरी यूजर थेट मुख्य वापरकर्त्याच्या खात्यातून पेमेंट करू शकतो.
मुख्य वापरकर्ता दरमहा 15,000 रुपयांपर्यंतची मर्यादा सेट करू शकतो आणि ही सुविधा 5 वर्षांपर्यंत वैध राहू शकते. या फिचरद्वारे होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची माहिती मुख्य वापरकर्त्याला मिळत राहील, ज्यामुळे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रणात राहतील.
हे फिचर कोणासाठी उपयुक्त?
ज्येष्ठ नागरिक : जे ज्येष्ठ नागरिक डिजिटल पेमेंट वापरण्यास कचरतात, त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त आहे. कुटुंबातील सदस्य त्यांना आपल्या खात्यातून पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकतात, ज्यामुळे ते लहान-मोठे व्यवहार सुरक्षितपणे करू शकतील.
पालक आणि मुले : पालक आपल्या मुलांना दैनंदिन खर्चासाठी किंवा अभ्यासासाठी लागणाऱ्या खर्चासाठी या फिचरद्वारे आपल्या ‘यूपीआय’ खात्याचा मर्यादित ॲक्सेस देऊ शकतात.
छोटे व्यावसायिक : जे छोटे-मोठे व्यवसाय करतात, ते आपल्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल, टोल किंवा इतर लहान खर्चांसाठी पेमेंट करण्याची परवानगी या फिचरद्वारे देऊ शकतात.
भीम ॲपवर ‘यूपीआय सर्कल’ कसे वापरावे?
हे फिचर वापरण्यासाठी मोबाईलमध्ये खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा : भीम ॲप उघडून होम स्क्रीनवरील ‘यूपीआय सर्कल’ पर्यायावर जा.
Invite to Circle वर टॅप करा आणि ज्या व्यक्तीला परवानगी द्यायची आहे, तिचा फोन नंबर टाका.
यानंतर Approve Monthly Limit निवडा. समोरच्या व्यक्तीसोबत तुमचे नाते निवडा आणि आधारद्वारे व्हेरिफाय करा.
त्यानंतर मासिक खर्चाची मर्यादा आणि कालावधी (1 महिना ते 5 वर्षांपर्यंत) निश्चित करा.आता तुमचे बँक खाते निवडा आणि UPI PIN टाकून व्हेरिफाय करा.
सेकंडरी यूजरने विनंती स्वीकारताच तो त्वरित पेमेंट करणे सुरू करू शकतो.