

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर काम सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे धुळीचे वाढते प्रमाण या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित करत, अहवाल सादर करण्यास विलंब करणाऱ्या महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
मुंबई शहर आणि उपनगरांतील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. तर वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
वनशक्तीच्या वतीने ऍड.जनक द्वारकादास यांनी ही याचिका मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून देताना मुंबईतील हवेची पातळी घसरी आहे. याकडे लक्ष वेधले. तसेच वर्षभरापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी एक्युआय सुधारण्यासाठी एकूण 27 उपाययोजनांची यादीपालिकेला देण्यात आली होती. त्याची अंमल बजावणी करून पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
पालिकेने 12 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करणे अपेक्षित होते . मात्र हा अहवाल अद्याप सादर झालेला नसल्याची माहिती ऍड.जनक द्वारकादास यांनी खंडपिठाला दिली. याची दखल घेत खंडपिठाने मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी उद्या शुक्रवारी तातडीने घेण्याचे निश्चित केले.
200 च्या कठावर एक्यूआय
सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दोनशेच्या काठावर आला असला तरी मुंबई शहर आणि उपनगरांत प्रदूषणाचा धोका कायम आहे.
शहरातील एक्यूआय बुधवारी 223वर पोहोचला होता. मात्र, एक्यूआयच्या संकेतस्थळानुसार, गेले तीन दिवस दोनशेपार असलेला हाच हवा गुणवत्ता निर्देशांक गुरुवारी 177 वर आला. गुरुवारी शिवाजी नगर,गोवंडी (196) सर्वात प्रदूषित ठिकाण होते. त्यानंतर बोरिवली पश्चिम (188) आणि मालाड (181) या पश्चिम उपनगरातील ठिकाणांचा समावेश आहे. याचा अर्थ ही प्रदूषण पातळी कोणत्याही क्षणी वाढू शकते.
सांताक्रुझ वेधशाळेच्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी किमान 23 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र, वीकेंडला (21/32 अंश सेल्सिअस) त्यात घट होऊ शकते. परिणामी, थंडीचा जोर पुन्हा वाढू शकतो.
28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान मुंबईत रस्ते धुलाई मोहीम
मुंबई : मुंबईतून धुळीकनातून होणारे वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने 28 ते 30 नोव्हेंबरला रस्ते व धूळ स्वच्छता मोहिम हाती घेण्याचे ठरवले असून वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अधिक असलेल्या विभागातील रस्त्यांची प्राधान्याने स्वच्छता करण्यात येणार आहे. वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अधिक असल्याने बोरिवली (पूर्व), मालाड (पश्चिम), चकाला-अंधेरी (पूर्व), देवनार, माझगाव, नेव्ही नगर कुलाबा, मुलुंड (पश्चिम), पवई या भागातील रस्त्यांची स्वच्छता केली जाईल.
मुंबईत अजूनही 246 बेकऱ्यांचे गॅसमध्ये रूपांतर झालेले नाही
मुंबई : मुंबई शहर उपनगरात अजूनही 246 बेकऱ्यांचे एलपीजी व पीएनजी गॅसमध्ये रूपांतर झालेले नाही. पालिकेच्या नोटिसांमुळे आतापर्यंत 347 बेकऱ्यांचे गॅसमध्ये रूपांतर झाले आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा बेकऱ्या बंद झाल्या. मुंबई शहर व उपनगरात 593 अधिकृत बेकऱ्या असून या बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर करून पाव व अन्य पदार्थ बनवले जात होते. परंतु लाकडांचा वापर करण्यात पूर्णपणे बंदी घातल्यामुळे टप्प्याटप्प्याने या बेकरी इंधनावर सुरू होत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.