

नवी मुंबई ः म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे सतरा लाखांचा अपहार करून एका महिलेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी आरएके मार्ग पोलिसांनी दत्ताराम विष्णू खाडे या आरोपीविरुद्ध अपहाराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दत्तारामने म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने इतर काही लोकांची फसवणूक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. तक्रारदार महिला ही वडाळा येथे तिच्या पती आणि दोन मुलांसोबत राहते. फ्लॅटसाठी तिने दत्तारामची भेट घेतली होती.
यावेळी त्याने नायगाव येथे म्हाडाचा एक फ्लॅट उपलब्ध असल्याचे सांगून तिला पंधरा दिवसांत सतरा लाख रुपये भरण्यास सांगितले होते. या पेमेंटनंतर तिला तीन महिन्यांत फ्लॅटचा ताबा देतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला होता. तिने अंबरनाथच्या तिच्या मालकीचा फ्लॅटची विक्री करुन दत्ताराम खाडेला सतरा लाखांचे पेमेंट केले होते.
या पेमेंटनंतर त्याने तीन महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले, मात्र तीन वर्ष उलटूनही त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा करुन तो वेगवेगळे कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच या महिलेने तक्रार केली होती.