

माऊ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील माऊ जिल्ह्यातून 'मॉरल पोलीसगिरी' आणि सार्वजनिक चौकशीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. शीतल माता मंदिराच्या परिसरात 'मिशन शक्ती' मोहिमेअंतर्गत गस्त घालत असताना, एका महिला पोलीस अधिका-याने चक्क एका बहिण-भावाच्या जोडीला ‘जोडपे’ समजून कठोर चौकशी केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या नात्याची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी थेट पालकांना फोन लावला आणि ओळख पटवून घेतली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी काही अल्पवयीन मुली आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलाची कसून चौकशी करताना दिसत आहेत. त्याच वेळी, अधिकारी फोनवर त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून मुला-मुलींच्या नात्याची खात्री करून घेत आहेत. हा व्हिडिओ माऊ जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिडिओत दिसत असलेली अधिकारी मंजू सिंह असून, त्या माऊ येथील महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी आहेत.
प्रभारी मंजू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि जनजागृतीसाठी चालवल्या जाणाऱ्या 'मिशन शक्ती' मोहिमेअंतर्गत त्या आपल्या टीमसोबत मंदिरात उपस्थित होत्या. मंदिराच्या परिसरात काही अल्पवयीन मुली फिरताना त्यांना दिसल्या. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान, मुलींसोबत असलेल्या मुलाची ओळख आणि त्यांच्या नात्याबद्दलही अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. यावेळी एका मुलीने सांगितले की, सोबत असलेला मुलगा तिचा सख्खा भाऊ आहे.
बहिण-भावाच्या नात्यावर खात्री करण्यासाठी महिला अधिकाऱ्याने थेट मुला-मुलींच्या कुटुंबीयांना फोन केला. यावेळी फोनवरून कुटुंबीयांनी खात्री दिली की, तो मुलगा खरोखरच संबधीत मुलीचा भाऊ आहे आणि ते सर्व गाझीपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. मुले मंदिरात दर्शनासाठी आली होती, याची पालकांना कल्पना होती.
सत्यता पटल्यावर पोलिसांनी आवश्यक माहिती घेऊन प्रकरण सुरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, या संपूर्ण प्रकरणानंतर महिला अधिकारी मंजू सिंह यांनी त्या मुलींना उद्देशून सल्ला दिला. त्या म्हणाल्या की, ‘तुम्ही मुलींनी एकट्याने फिरू नये, नेहमी कोणत्याही एका पालकांना किंवा मोठ्या व्यक्तीला सोबत घेऊनच बाहेर फिरावे.’
जरी महिला अधिकाऱ्याने 'मिशन शक्ती' अंतर्गत अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ही चौकशी केल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी या घटनेमुळे सार्वजनिक चर्चांना उधाण आले आहे. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी बहिण-भावाला जोडपे समजून त्यांची ओळख पटवण्यासाठी पालकांना फोन करणे ही पोलिसांची अतिदक्षता आहे, की मॉरल पोलीसगिरी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सध्या या व्हायरल व्हिडिओमुळे महिला पोलीस अधिकारी मंजू सिंह यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे.