

police raid party hotel
बंगळूर : मित्रांबरोबर हॉटेलमध्ये पार्टीसाठी तरुणी गेली. हॉटेलमध्ये तीन रूम बुक केल्या. पहाटे एक वाजेपासून सुमारे पाच वाजेपर्यंत पार्टी सुरू होती. मात्र पहाटे हॉटेल रूममध्ये धिंगाणा झाल्याने पोलिसांनी बंगळूर शहरातील हॉटेलवर छापा टाकला. यावेळी पोलीस कारवाईपासून बचाव करण्यासाठी एका २१ वर्षीय तरुणीने हॉटेलच्या ड्रेनपाईपच्या साहाय्याने खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बाल्कनीतून खाली पडून ती गंभीर जखमी झाली आहे.
गंभीर जखमी झालेल्या तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी सात मित्रांसह बंगळूर येथील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. त्यांनी तीन खोल्या बुक केल्या होत्या. मध्यरात्री एकपासून पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांची पार्टी सुरू होती.
पार्टीच्या वेळी झालेल्या गोंधळ आणि आवाजामुळे स्थानिक रहिवाशांनी ११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. या माहितीनुसार, पोलीस लॉजवर पोहोचले. त्यांनी पार्टी करणाऱ्या तरुणांना हटकले. त्यांचा आरडाओरडा आणि गोंधळ परिसरातील रहिवाशांना त्रासदायक ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या हटकल्यानंतर लगेचच, संबंधित तरुणी घाबरली आणि तिने कथितरित्या चौथ्या मजल्यावरील खोलीच्या बाल्कनीतून ड्रेनपाईपच्या साहाय्याने खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती खाली पडून गंभीर जखमी झाली. तिच्या मित्रांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाल्कनीच्या परिसरात पुरेशा सुरक्षा उपाययोजना न ठेवल्यामुळे लॉज व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. न्याय मिळावा यासाठी तरुणीचे मित्र, लॉजचे कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.