

पुढारी ऑनलाईन डेस्क
बहुजन समाज पक्षाच्या (BSP) राष्ट्रीय अध्यक्षपदी मायावती (Mayawati) यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्या गेली २१ वर्षे राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम आहेत. मायावती यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार नाही, असे स्पष्ट केल्याच्या एका दिवसानंतर पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीने त्यांच्या हाती पुन्हा बसपाच्या अध्यक्षपदाची सुत्रे दिली आहेत. बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज मंगळवारी लखनौ येथे झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मायावती यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांचा भाचा आकाश आनंद कायम राहणार आहे. आकाश आनंद पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक राहतील, असा निर्णय बसपाच्या कार्यकारी समितीने घेतला आहे. मायावती यांची एकमताने पाच वर्षांसाठी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्र यांनी मायावतींच्या निवडीचा प्रस्ताव दिला होता. मायावती २००३ पासून बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
मायावती यांनी सोमवारी राजकारणातून निवृत्तीच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारच्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत त्यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड होणार हे निश्चित होते.
लखनौ (UP News) येथील बसपा कार्यालयात आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसह राज्यातील १० जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या रणनितीवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बसपाच्या सर्वेसर्वा गेल्या काही दिवसांपासून पोटनिवडणुकीपासून दूर होत्या. पण आता उत्तर प्रदेशमधील १० विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीमुळे त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. बसपाने सर्व १० जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद यांच्या नावाची त्यांचे राजकीय वारसदार आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून घोषणा केली होती.
बसपाची यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये चारवेळा सत्ता राहिली होती. पण गेल्या काही वर्षात पक्षाची पिछेहाट झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला १० जागा मिळाल्या होत्या. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नाही. २०१९ मधील १९.२ टक्क्यांच्या तुलनेत त्यांच्या मतांची टक्केवारी आता ९.३ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतांची टक्केवारी सर्वात कमी राहिली होती. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ १२.८ टक्के मते मिळाली होती.