पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.२७ ऑगस्ट) जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज स्वीकारत दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत त्यांना दिलासा दिला. तसेच दिल्ली मद्य धोरण घोटाळा सीबीआय आणि ईडी या दोन्ही प्रकरणांमध्ये के. कविता यांना ताबडतोब जामीनावर सोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वी आप नेते मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर याच प्रकरणात आता के. कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. दरम्यान न्यायालयाने साक्षीदारांशी छेडछाड करू नये आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, पासपोर्ट जमा करणे तसेच प्रत्येकी १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर के. कविता यांना जामीन मंजूर केला आहे.
के. कविता पाच महिन्यांपासून तुरुंगात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आहेत. या खटल्यात 493 साक्षीदार आणि अनेक कागदपत्रे असल्याने खटला पूर्ण होण्यास वेळ लागेल असे न्यायालयाने नमूद केले आहे. सहआरोपींच्या विधानांवर हा खटला अवलंबून असल्याचे न्यायालयाने आज सुनावणीवेळी स्पष्ट केले.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) यांनी मार्चमध्ये केलेल्या अटकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.२७ ऑगस्ट) के. कविता यांना जामीन मंजूर केला. के. कविता ह्या भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत.
के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या होत्या. ईडीने आरोप केला आहे की 'साउथ ग्रुप' नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत 'आप' नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटकेत होते. काही दिवसांपूर्वी या दोघांनाही दिलासा मिळाला आहे. (K. Kavita News)