

Crime News
आग्रा: गेल्या महिन्यात घरातून पळून जाऊन मंदिरात लग्न करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीची आणि तिच्या २३ वर्षीय पतीची तिच्याच कुटुंबीयांनी निर्घृण हत्या केली. त्यांना घरी बोलावून आधी बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर भररस्त्यात गावकऱ्यांसमोर त्यांचे गळे चिरण्यात आले. ही धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जैथरा पोलीस ठाण्यांतर्गत गढिया सुहागपूर गावात घडली.
या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबातील पाच सदस्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि १९१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे वडील अशोक कुमार (४५), आई वितोली देवी (४२) आणि बहीण शिल्पी (२०) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिचे भाऊ सतीश आणि जबर सिंग विकास सध्या फरार आहेत.
एसएसपी श्याम नारायण सिंग यांनी सांगितले की, "तरुणीच्या वडिलांनी आपल्या मुलांसह मिळून हा दुहेरी खून केला आहे."
मृत शिवानी कुमारी आणि दीपक कुमार हे प्रयागराज येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. दोघेही लोधी-राजपूत समाजातील असून एकाच परिसरात राहत होते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. ११ डिसेंबर रोजी त्यांनी तरुणीच्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रयागराजमधील आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. शनिवारी आई-वडिलांनी बोलावल्यानंतर शिवानी तिच्या माहेरी परतली होती. रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास जेव्हा दीपक तिला भेटायला आला, तेव्हा गावकऱ्यांसमोरच या नवविवाहित जोडप्यावर काठ्या आणि खुरप्याने हल्ला करण्यात आला.
त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर आधी शिवानीचा गळा चिरला. दीपक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला तेव्हा त्याला पकडून त्याचाही गळा चिरण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी रक्ताने माखलेला मृतदेह शेजाऱ्याच्या घराच्या छतावर फेकून दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत शिवानीचा मृत्यू झाला होता. दीपकचा श्वास सुरू असल्याने त्याला तातडीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तिथून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनविभागात कार्यरत असलेले दीपकचे वडील राधेश्याम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.