

Crime News
बेळगाव : 'बाप' म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ, मुलांवर कोणतंही संकट आलं, तर दिवसरात्र कष्ट उपसून त्यांना सुरक्षित ठेवणारा बापाला आदराचं स्थान असतं. पण, जेव्हा हाच बाप 'भक्षक' बनतो, तेव्हा माणुसकी आणि नात्यांवरचा विश्वास उडून जातो. अशीच एक कर्नाटकच्या चिक्कमंगलुरू जिल्ह्यातील बिरूर येथून माणुसकीला लाजवणारी आणि बापाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशासाठी एका बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले. ज्या आजीने नातीचे रक्षण करायला हवे होते, ती आजीदेखील यात सामील होती.
बिरूर येथील पीडित अल्पवयीन मुलीच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर ती आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. तिथेच तिने १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या वडिलांच्या घरी परत आली होती. डिसेंबरमध्ये तिचे वडील तिला घेऊन आजीच्या घरी गेले होते. तिथे ते दोन दिवस थांबले. त्याचवेळी वडील आणि तिच्या आजीने तिचा सौदा केला.
भरत शेट्टी नावाच्या एका माणसाने तिच्या वडिलांना आमिष दाखवले. वेश्या व्यवसायात मुलगी दररोज ५ हजार रूपये कमवेल असे सांगितले. नराधम बाप पैशाच्या लोभाला भूलला आणि स्वत:च्या लेकीचा सौदा केला. त्यानंतर वडील आणि भरत शेट्टी मुलीला घेऊन मंगळुरूला गेले. वाटेत मुलीने मासिक पाळी आल्याचे आणि तब्येत ठीक नसल्याचे वडिलांना सांगितले. पण पैशांसाठी हैवान बनलेल्या बापाने मुलीचे काहीही ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी भरत शेट्टीने मुलीला धमकावत जे पुरुष येतील त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले.
दोन दिवस २० ते ४५ वयोगटातील चार पुरूषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी त्यांच्यासमोर रडली, हात जोडले, विनंती केली तरी तिचे कोणीही ऐकले नाही. भरत शेट्टीला पैसे देऊन तिचे लैंगिक शोषण करत राहिले. सलग दोन-तीन दिवस गेल्यानंतर अत्याचार सहन न झाल्याने तरुणीने हिंमत दाखवली आणि पोलीस स्टेशन गाठले. तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी नराधम बापासह १२ जणांना अटक केली आहे.