

Crime News
अलीगढ: कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा करत असलेल्या विद्यार्थीनीने वडिलांशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना गळफास घेवून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठात सोमवारी (दि. ११) रात्री ही घटना घडली.
आझमगढ येथील २० वर्षीय इन्शा फातिमा ही एएमयूमध्ये संगणक शास्त्रात अंतिम वर्षाच्या डिप्लोमाची विद्यार्थिनी होती. ती एसएन हॉलच्या खोलीमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यीनींसोबत राहत होती. सहकारी विद्यार्थीनी सुट्टीवर गेल्याने सोमवारी संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास इन्शा तिच्या खोलीत एकटी होती. ती तिच्या वडिलांशी लॅपटॉपवर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. तिचे वडील सौदी अरेबियामध्ये राहतात.
बोलता-बोलता अचानक इन्शाने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून घेतला. हे दृश्य पाहून वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने एएमयूमध्ये काम करणाऱ्या एका नातेवाईकाला फोन करून माहिती दिली. नातेवाईकाचा मुलगा तातडीने हॉस्टेलवर पोहोचला. त्यानंतर हॉस्टेल कर्मचारी तिथे पोहोचले. खोलीचा दरवाजा उघडाच होता आणि इन्शा फाशी घेतलेल्या अवस्थेत तडफडत होती.
तिला तातडीने खाली उतरवण्यात आले आणि उपचारासाठी जेएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र रात्री उशिरा सुमारे तीन तासांनी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, तिने हा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.