UP crime
लखनऊ : पहिल्या पत्नीकडे जाण्याच्या पतीच्या इच्छेमुळे संतापलेल्या पत्नीने क्रौर्याची परिसीमा गाठल्याची एक मन सुन्न करणारी घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातून रविवारी समोर आली आहे. दुसऱ्या पत्नीने पतीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले, त्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने सपासप वार केले आणि त्यानंतर त्याचे गुप्तांग कापले. (UP Crime News)
या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना जगदीशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैगलगंज कचनाव गावात घडली. अन्सारी अली असे पीडित पतीचे नाव आहे. पीडित व्यक्तीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे पहिल्या पत्नीसोबत १४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे, सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्याने ३२ वर्षीय दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. मात्र, अलीकडेच त्याने पहिल्या पत्नीसोबत पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होऊ लागले होते. या रोजच्या त्रासाला कंटाळून दुसऱ्या पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले.
रविवारी आरोपी पत्नीने पती अन्सारी अलीला जेवणातून गुंगीचे औषध दिले. औषधामुळे पती बेशुद्ध झाल्यानंतर तिने चाकूने त्याचे गुप्तांग कापले. इतकेच नाही, तर तिने पतीच्या शरीरावर चाकूने वार केले. पती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ती घरातून पसार झाली. अन्सारीच्या भावाने सांगितले की, "घरातून आरडाओरडा ऐकू आल्याने आम्ही तिकडे धाव घेतली. तेव्हा भावाची पत्नी नजनी घरातून पळून जात होती. आम्ही घरात जाऊन पाहिले असता, भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याचे गुप्तांग कापलेले दिसले. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले."
पत्नीच्या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन पत्नींमधील वाद हेच या घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे," असे पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपी महिलेने पतीला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. शनिवारी रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, असा आरोप पीडिताच्या भावाने केला आहे. या भयंकर कृत्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. भावाच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला असून, "आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे," असे पोलिसांनी सांगितले.