

Mumbai Crime
मुंबई : परीक्षेत नापास झाल्याने घरातून पळून आलेल्या १२ वर्षीय बांगलादेशी मुलीला वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील वसईजवळील नायगाव परिसरात सुरू असलेल्या या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. पीडित मुलीने मानवी तस्करीच्या क्रूर वास्तवाचा उलगडा करत सांगितले की, तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी तिच्यावर बलात्कार केला.
२६ जुलै रोजी मुंबईतील दोन स्वयंसेवी संस्था एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन यांनी मीरा-भाईंदरच्या मानव तस्करी विरोधी पथकाच्या समन्वयाने मीरा-भाईंदर-विरार-वसईचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बचाव मोहीम राबवली. पोलिस अधिकाऱ्यांना कारवाईत आढळले की, बांगलादेशातील १२ वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. पोलिसांनी त्याच ठिकाणाहून तस्करीला बळी पडलेल्या बांगलादेशातील २० वर्षीय महिलेचीही सुटका केली. पोलिसांनी मोहम्मद खालिद बापारी, जुबेर शेख आणि शमीन सरदार या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली.
हार्मोनी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शाळेच्या परीक्षेत नापास झाल्याने पालकांच्या भीतीने ही मुलगी घरातून पळून गेली होती. त्यानंतर तिच्याच गावातील 'मीम' नावाच्या एका महिलेने तिला आमिष दाखवून फसवले. तिला सीमेपलीकडून बेकायदेशीरपणे कोलकाता येथे आणण्यात आले. कोलकातामध्ये तिचे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले. त्यानंतर तिला विमानाने मुंबईत आणून नायगावमध्ये डांबून ठेवण्यात आले.
'हार्मनी फाउंडेशन'ने दिलेल्या निवेदनानुसार, "नायगावमध्ये तिला एका वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या पत्नीसोबत इतर ७-८ मुलींसोबत ठेवण्यात आले होते. एके दिवशी त्या वृद्धाने तिला इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. तेव्हापासून तिच्या इच्छेविरुद्ध तिला अनेक अनोळखी पुरुषांना विकले जात होते." तिला ड्रग्जचे इंजेक्शन देऊन तिचे लैंगिक शोषण केले जात होते, असेही या निवेदनात म्हटले आहे. डॉ. मथाई यांनी सांगितले की, "खालिद बापरी आणि त्याच्या साथीदारांच्या नेतृत्वाखालील तस्करी नेटवर्कद्वारे या अल्पवयीन मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसायासाठी अनेक शहरांमध्ये वारंवार पाठवले जात होते."
"पीडित मुलीने सांगितले की, तिला पहिल्यांदा गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले आणि तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही मुलगी अद्याप किशोरावस्थेत पोहोचलेली नाही, परंतु देह व्यापारातील अशा राक्षसांनी तिचे बालपण हिरावून घेतले आहे," असे अब्राहम मथाई यांनी सांगितले. तसेच त्यांनी मुलीवर अत्याचार करणाऱ्या सर्व २०० पुरूषांना अटक करण्याची मागणी केली आहे.