पियुष गोयल : ‘मोदी सरकारच्या धोरणांनी देशाची आर्थिक, गुंतवणूक क्षेत्रात दमदार कामगिरी’

पियुष गोयल : ‘मोदी सरकारच्या धोरणांनी देशाची आर्थिक, गुंतवणूक क्षेत्रात दमदार कामगिरी’

Published on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मोदी सरकारच्या धोरणांमुळेच देश आर्थिक आणि गुंतवणूक क्षेत्रात दमदार कामगिरी करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी लोकसभेत त्यांच्याशी संबंधित मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना केले.

मोदी यांनी ज्यावेळी पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतला, त्यावेळी अर्थव्यवस्था कमजोर स्थितीत होती. मात्र गेल्या सात वर्षात पारदर्शक कारभार करून, परिणाम देणारी प्रशासन यंत्रणा राबवून भेदभावरहित काम केल्यामुळे आर्थिक आणि गुंतवणूक क्षेत्रात भारत चमकदार कामगिरी करीत आहे, असे गोयल यांनी नमूद केले. सर्वच क्षेत्रात सरकारने मूलभूत सुधारणा केल्याचे सांगून मोदी पुढे म्हणाले की, स्टार्टअप इकोसिस्टममध्ये भारत आज जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या मंत्रालयाच्या अखत्यारीतच 65 हजार स्टार्टअप नोंदणीकृत आहेत. राष्ट्रीय पायाभूत सुविधा विकासासाठी सरकारने शंभर लाख कोटी रुपयांच्या परियोजना हाती घेण्याचा निर्धार केला आहे.

सरकारने पोलाद, सेमीकंडक्टर, मोबाईल आणि बॅटरी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या क्षेत्राकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले होते. एकट्या सेमीकंडक्टर उद्योगांसाठी 76 हजार कोटी रुपयांची योजना हाती घेण्यात आली आहे, असे गोयल यांनी नमूद केले. सरकारकडून इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगून ते म्हणाले की, चौदा क्षेत्रासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना राबविली जात आहे. याद्वारे सदर क्षेत्राना दोन लाख कोटी रुपयांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भारताची हिस्सेदारी वाढविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. जोवर गुंतवणुकीचा प्रश्न आहे, आज जगातले सर्व प्रमुख देश भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. देशाचा विदेशी चलनसाठा 630 अब्ज डॉलर्सच्या वर गेलेला आहे. निर्यात क्षेत्राकडून चांगली कामगिरी होत आहे. चालू आर्थिक वर्षात 400 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. एकूण निर्यातीमधला कृषी क्षेत्राचा वाटा 50 अब्ज डॉलर्सचा आहे.

चोरी आणि शिरजोरी…असे चालणार नाही……

देशातील काही उद्योग घराण्यांवर अलीकडेच छापे टाकण्यात आले होते. त्याचा संदर्भ देत विरोधी सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार केला होता. यावर गोयल म्हणाले की, तपास संस्थांकडून टाकले जात असलेले छापे आणि गुंतवणूक याचा काय संबंध आहे हेच मला समजत नाही. 'चोरी ते चोरी आणि वर शिरजोरी असे चालणार नाही'. जर कोणी मोठा उद्योगपती आहे आणि कारवाई होणार नाही… असे होणार नाही. जर कोणी चुका करीत असेल तर त्याच्यावर कारवाई ही होणारच.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news