

Union Budget 2026Stock Market Open: केंद्रीय अर्थ संकल्प प्रत्येक वर्षी १ फेब्रुवारीला सादर केला जातो. यावेळी १ फेब्रुवारीला रविवार आला आहे. त्यामुळं या दिवशी अर्थ संकल्प सादर होणार की नाही याबाबत चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान इंडिया टुडेच्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या रविवारी १ फेब्रुवारी २०२६ लाच केंद्रीय अर्थ संकल्प सादर करण्याचा शक्यता आहे.
संसदीय कार्य समितीच्या (CCPA) बुधवारी होणाऱ्या बैठकीत अर्थ संकल्पाच्या संसदीय सत्राच्या तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'CCPA च्या बैठकीत संसदेचं अर्थ संकल्पीय अधिवेशन आणि या वर्षी कोणत्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल या दोन्हीची तारीख निश्चित केली जाईल. एक फेब्रुवारीला रविवार आल्यामुळं अनिश्चितता निर्माण झाली आहे.
सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेश २८ जानेवारी रोजी सुरू होईल. हे सत्र राष्ट्रपतींच्या संबोधनानंतर सुरू होऊ शकतं. आर्थिक सर्वेक्षण २९ जानेवारी रोजी पटलावर ठेवलं जाईल. त्यानंतर ३० आणि ३१ जानेवारी रोजी सुट्टी असेल. समितीने मंजुरी दिली तर १ फेब्रुवारी रविवारी केंद्रीय अर्थ संकल्प सादर केला जाईल.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ ची तयारी आधीपासूनच सुरू झाली आहे. अर्थ संकल्पाच्या आधी चर्चेसाठी ९ ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर या दरम्यान बैठका झाल्या होत्या. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाचा अंदाज आणि २०२५-२६ अर्थसंकल्पातील संशोधन यांना अंतिम स्वरूप देण्यात आलं होतं. अर्थ मंत्रालय केंद्रीय सांखिकी कार्यालयाकडून जीडीपी अंदाज देखील मिळवण्याची प्रक्रिया यात समाविष्ट आहे. याचा उपयोग अर्थ संकल्पाच्या शेवटच्या गणनेवेळी केला जाईल.
गेल्या वर्षी अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठवा अर्थ संकल्प सादर केला होता. त्यांनी त्यावेळी अर्थ मंत्र म्हणून दोन कार्यकाळात मिळून १० अर्थ संकल्प सादर केले. त्यांनी माजी प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या विक्रमाशी बरोबरी देखील केली.
जर १ फेब्रुवारी रविवारी अर्थ संकल्प सादर केला गेला तर त्या दिवशी शेअर बाजार देखील खुला राहण्याची शक्यता आहे. या दिवशी तुम्ही ट्रेडिंग देखील करू शकाल. याचबरोबर शेअर खरेदी विक्री देखील होण्याची शक्यता आहे. मात्र अजून तरी एक्सचेंज कडून १ फेब्रुवारीला शेअर मार्केट खुलं राहणार की नाही याबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.
अर्थसंकल्प इतिहास
भारतात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा २६ नोव्हेंबर १९४७ पासून चालत आली आहे, जेव्हा आर.के. षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या अनेक दशकांपासून मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांसारख्या दिग्गज नेत्यांनी वेळोवेळी मांडलेल्या अर्थसंकल्पांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक धोरणांना आकार दिला आहे. भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर महिलांमध्ये सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे.