

Jammu Kashmir Terrorist encounter
जम्मू-कश्मीर : जम्मू-कश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील डुडू-बसंतगड परिसरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. परिसरात अजूनही गोळीबार सुरू आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरुद्ध मोठी शोध मोहीम सुरू आहे. जम्मू-कश्मीर पोलिस आणि लष्कराकडून संयुक्तपणे डुडू-बसंतगड भागात ही शोधमोहीम सुरू आहे. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला, ज्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात एक जवान शहीद झाला आहे. व्हाइट नाईट कोरच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, “गोपनीय माहितीच्या आधारे उधमपूरच्या बसंतगड परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान सुरक्षादलांना दहशतवाद्यांशी संपर्क आला आणि जोरदार गोळीबार सुरू झाला. यावेळी लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला. वैद्यकीय उपचार सुरू असताना तो शहीद झाला.”
मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून २६ जणांची निर्घृण हत्या केली. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर ते हिंदू असल्याचे सांगत त्यांना गोळ्या घालून ठार मारले. २६ मृतांपैकी बहुतेक पर्यटक आहेत, तर दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिक आहेत.
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचा वज्रनिर्धार बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. भारताने काल रात्री दिल्लीतील पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावले आणि त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी औपचारिक पर्सोना नॉन ग्राटा नोट सुपूर्द केली आहे.