

Pahalgam Terror Attack Latest News
दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संताप उसळला आहे. दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा वज्रनिर्धार भारताने केला असताना, भारताकडून कोणताही हल्ला किंवा धमकी आल्यास पाकिस्तानमधील सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन देशाचे संरक्षण करतील, असे पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी म्हटले आहे. ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.
पाकिस्तानला कडक उत्तर देण्यासाठी भारताने कॅबिनेट सुरक्षा समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत पाच निर्णय घेतले आहेत. सिंधू जल करार स्थगिती, पाकिस्तानी राजदूतांना मिळणारी लष्करी सल्लागारांची सेवा बंद, अटारी वाघा सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंद आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी संख्येत कपात असे धोरणात्मक निर्णय घेत पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याला भारताने सडेतोड जवाब दिला आहे. भारताच्या कडक निर्णयानंतर पाकिस्तानने चांगलीच धास्ती घेतली आहे.
या दहशतवादी हल्ल्याशी आमच्या देशाचा संबंध नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी भारताकडून कोणताही हल्ला किंवा धमकी आल्यास पाकिस्तानने एकसंघ राहून उत्तर द्यावे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, पाकिस्तान राजकीयदृष्ट्या विभागलेला असला तरी आम्ही राष्ट्र म्हणून एक आहोत. जर भारताने हल्ला केला किंवा धमकी दिली, तर सर्व प्रमुख पक्ष एकत्र येऊन देशाचे रक्षण करू.
हल्ल्यानंतर भारतात काय घडतेय, याकडे लक्ष ठेवून असलेल्या फवाद हुसेन यांनी दुसरी पोस्ट करत मोदी सरकारने संयम बाळगावा, असे आवाहनही केले आहे. भारतीय कॅबिनेटने आपली सुरक्षा बैठक पूर्ण केली आहे. आशा आहे की सगळे शांत डोके ठेवून निर्णय घेतील आणि युद्धाच्या घोषणा देणाऱ्या मीडियाच्या दबावाला बळी पडून कोट्यवधी लोकांचे प्राण धोक्यात टाकणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारताने सिंधु जल कराराला तत्काळ स्थगिती दिल्यानंतर फवाद हुसेन यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारत भारतीय खोरे करार स्थगित करू शकत नाही. हे करार कायद्याचे घोर उल्लंघन असेल. या बालिश निर्णयाचा परिणाम फक्त पंजाब आणि सिंधमधील गरीब शेतकऱ्यांवर होईल, असे म्हटले आहे.