

Uddhav Thackeray Sharad Pawar Meeting
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी शरद पवार आणि कुटूंबीयांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व खासदार यावेळी उपस्थित होते. तत्पुर्वी बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही आहेत. उद्धव ठाकरे दुपारी ३ च्या सुमारास दिल्ली विमानतळावर दाखल झाले त्यानंतर त्यांचा ताफा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाला. संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार- उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये महाविकास आघाडी म्हणून कशा पद्धतीने पुढे जायचे, सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय भूमिका घ्यायची आणि विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकार, केंद्र सरकारवर हल्ला चढवण्यासाठी काय रणनीती असली पाहिजे यावर चर्चा झाल्याचे समजते.
इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक गुरुवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीला देखील उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये आगामी आगामी काळात होऊ घातलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होऊ शकते. सोबतच बिहारमधील मतदार सुधारणा यादी आणि इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.