

मुंबई : कोणताही मंत्री बेशिस्त वर्तणूक करेल तर खपवून घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई होईल. मंत्र्यांच्या वर्तनावर अंकुश असणे आवश्यक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांना वर्तन सुधारण्याची तंबी दिली असून मंत्रिमंडळात आता कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सततची वादग्रस्त विधाने आणि विधानपरिषदेत रमी खेळताना आढळलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते काढून घेतल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना वर्तन सुधारण्याचा सल्ला शुक्रवारी नागपुरात बोलताना दिला.
‘आपण जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेत आलो आहोत. ते करत असताना आपण काय बोलतो, व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता बघत असते. त्यामुळे त्यावर अंकुश असणे आवश्यक आहे. त्यामुळे बेशिस्त वर्तणूक करेल तर खपवून घेणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी स्वतः ही बाब सर्वच मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, सभागृहात जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता. त्या संदर्भात अजित पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. कृषी खाते हे दत्ता भरणे यांना देण्यात आले आहे. आता मंत्रिमंडळात दुसरा कुठलाही बदल करण्यातबाबत चर्चा नाही.
माजी मंत्री धनंंजय मुंडे यांच्या सत्तावर्तुळातील भेटीगाठी वाढल्याने त्यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशा चर्चा सुरू झाल्या. या चर्चांनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. आता मंत्रिमंडळात दुसरा कुठलाही बदल करण्यातबाबतची चर्चा नाही. धनंजय मुंडे यांनी तीन वेळा माझी भेट घेतली आहे. प्रत्येक भेट वेगवेगळ्या कारणांसाठी होती. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे करतो, असे सांगून मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली.