ऑलम्‍पिक पदक विजेता सुशील कुमार कैद्यांना देणार कुस्‍तीचे धडे

ऑलम्‍पिक पदक विजेता सुशील कुमार कैद्यांना देणार कुस्‍तीचे धडे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा ऑलम्पिक स्पर्धेत देशाचे नाव मोठे करणारा कुस्तीपटू सुशील कुमार आता कारागृहातील कैद्यांना फिटनेस आणि कुस्तीचे धडे देणार आहे. पहलवान सागर धनकड हत्येप्रकरणी सुशील कुमार तिहाड कारागृहात कैद आहे. कारागृह प्रशासनाने त्याला कैद्यांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा ते सात कैदी त्याच्याकडून फिटनेस आणि कुस्तीचे धडे शिकत आहेत.

नुकतेच सुशील कुमारने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही कैद्याला कुस्ती शिकायची असेल तर सुशील त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याआधी सुशीलला इतर कैद्यांना फिटनेस आणि कुस्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोना महारोगराईच्या लाटेमुळे हे प्रशिक्षण सुरू होऊ शकले नव्हते. आता कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर सुशील कैद्यांना फिटनेस प्रशिक्षण देऊ शकतो, असे कारागृहातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबर २०२१ मध्ये, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी, दिल्ली कारागृह विभागाने तिहारमधील कैद्यांना विविध खेळांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता. एका प्रकल्पांतर्गत कैद्यांना खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बुद्धिबळ आणि कॅरम या सहा खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. या अनुषंगाने सुशील कुमारच्या शिकवणीचा फायदा सर्व कैद्यांना होईल. यामुळे सर्व कैदी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. तसेच या प्रक्रियेमुळे कैदी व्यस्त राहतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ४ आणि ५ मे २०२१ च्या मध्यरात्री दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात सागर धनकड नावाचा पहिलवानाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारचेही नाव समोर आले होते. तपासादरम्यान पोलिसांना एक व्हिडिओही सापडला, ज्यामध्ये सुशील कुमार मारहाण करताना दिसत होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news