वीज संकट टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नरत; उर्जा प्रकल्पांना ४८.२३ दशलक्ष टन कोळसा पुरवठा

वीज संकट टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नरत; उर्जा प्रकल्पांना ४८.२३ दशलक्ष टन कोळसा पुरवठा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील विविध भागांमध्ये यंदा भीषण उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. कडक उन्हाळ्याच्या सुरूवातीला पडलेल्या अवकाळी पावसामुळे देशातील वीज मागणीत घट झाली होती. पंरतु, आता अनेक राज्यांमध्ये उन्हाचे चटके बसत असल्याने वीज मागणी वाढली आहे. अशात गतवर्षीप्रमाणे कोळशाच्या अभावामुळे वीज निर्मितीत येणारे अडथळे टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कंबर कसली आहे.

फेब्रुवारी, मार्चप्रमाणे एप्रिल महिन्यात देखील मोठ्याप्रमाण कोळसा पुरवठा करण्यात आला. रेल्वेद्वारे औष्णिक आणि औद्योगिक केंद्रांना कोळसा पुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या वाहतुकीत १५.०७ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल-२०२२ च्या तुलनेत यंदा कोळसा पुरवठ्यात ५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेने औष्णिक उर्जा प्रकल्पांसाठी ४८.२३ दशलक्ष टन मॅट्रिक टन कोळसा वाहतूक केली. विशेष म्हणजे गत महिन्यात कोळसा आयातीत देखील १८.४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. एप्रिल मध्ये ५ लाख टन कोळसा आयात करण्यात आला. रेल्वेच्या दक्षिण आणि पश्चिम विभागातील मालवाहतुकीत अनुक्रमे १२१ आणि ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. देशातील काही भागामध्ये सुरूवातीच्या काळात पडलेल्या पावसामुळे विजेची मागणी अपेक्षेपेक्षा कमी नोंदवण्यात आली होती.

देशातील एकूण वीज मागणी जूनपर्यंत २२० गिगावॅटच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच वीजेची मागणी २०० गिगावॅटपर्यंत पोहचली होती. तर, एप्रिलमध्ये विजेची मागणी १८० ते १८५ गिगावॅटपर्यंत नोंदवण्यात आली. अशात वाढती वीज मागणी लक्षात घेता रेल्वे विभाग कोळसा पुरवठ्याच्या अनुषंगाने विशेष प्रयत्नरत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news