

तिरुवनंतपुरम: केरळच्या तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने ऐतिहासिक विजय नोंदवत सीपीआय (M) च्या नेतृत्वाखालील एलडीएफकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. या महानगरपालिकेवर गेल्या ४५ वर्षांपासून डाव्या पक्षाचे वर्चस्व होते.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या एकूण १०१ प्रभागांमध्ये निवडणूक झाली. यात भाजपने ५० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर एलडीएफला २९, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफला १९ जागा मिळाल्या, तर २ जागा अपक्षांच्या खात्यात गेल्या.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील या विजयाने भाजपसाठी महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. दशकांनंतर एलडीएफ व्यतिरिक्त इतर पक्षाचा नेता महापौर बनणार आहे. या संपूर्ण राजकीय गदारोळात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव आहे आर. श्रीलेखा. त्यांनी सस्थामंगलम प्रभागातून विजय मिळवला आहे. त्या भाजपच्या वतीने महापौरपदाचा चेहरा असल्याचे मानले जात आहे.
आर. श्रीलेखा यांनी सांगितले की, सस्थामंगलम प्रभागामध्ये आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराला इतके मोठे मताधिक्य मिळाले नव्हते. 'तुम्ही महापौर होणार का?' असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, हा निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल. आर. श्रीलेखा यांचे नाव महत्त्वाचे आहे कारण त्या केरळच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. जानेवारी १९८७ मध्ये आयपीएसमध्ये सामील झालेल्या श्रीलेखा यांनी राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी सीबीआय, क्राईम ब्रँच, दक्षता, अग्निशमन दल, मोटार वाहन विभाग आणि तुरुंग प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे.
२०१७ मध्ये त्यांची पोलीस महासंचालक पदावर पदोन्नती झाली आणि त्या या पदावर पोहोचणाऱ्या केरळच्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी ३३ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती घेतली.
निवृत्तीनंतरही त्या अनेक मुद्द्यांवर आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिल्या. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोलीस सेवेदरम्यान आपण कोणताही राजकीय हेतू न ठेवता काम केले, असे त्यांचे म्हणणे आहे.
आर. श्रीलेखा यांनी सास्तमंगलम प्रभागातून मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर, भाजपच्या या यशातील एक प्रमुख चेहरा म्हणून त्या समोर आल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे ६४ वर्षीय माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. जर त्यांची नियुक्ती झाली, तर त्या राज्याच्या राजधानीतील पक्षाच्या पहिल्या महापौर ठरतील.