

Telangana News
निजामाबाद : कौटुंबिक तणाव, कर्जबाजारीपणा, व्यवसायातील नुकसान, अशा अनेक सामाजिक, भावनिक, आर्थिक आणि मानसिक समस्यांमुळे आत्महत्या केल्याच्या घटना वाढत आहेत. मात्र 'संकटावर मार्ग न शोधता आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा शेवट नाही,' हे ठामपणे समजावून सांगत तेलंगणातील एका गावात ३ वर्षात ३०० लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. जाणून घ्या, मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या गावाची गोष्ट...
तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले 'यमचा' हे एक छोटेसे गाव आहे. हैदराबादपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात सुमारे १,७०० लोक राहतात. गेल्या तीन वर्षांत या गावातील लोकांनी ३०० हून अधिक लोकांना आत्महत्या करण्यापासून वाचवले आहे. गावाच्या जवळ असलेल्या बसरा पुलावरून उडी मारून अनेकजण आत्महत्या करतात. त्यामुळे नेहमी या पुलाकडे बारकाईने लक्ष ठेवले जाते. पावसाळ्यात ही भीती आणखी वाढते. कारण नदीतील पाण्याची पातळी वाढते आणि हा पूल अशा घटनांचे केंद्र बनतो. गावातील बहुतेक लोक चांगले पोहणारे आहेत. नदीच्या तीव्र प्रवाहातही ते पोहू शकतात.
या गावातील लिंगैया नावाच्या एका ग्रामस्थाने सांगितले की, गेल्यावर्षी आम्ही एका वडिलांना आणि त्याच्या दोन मुलांना नदीत उडी मारल्यानंतर वाचवले. आणखी एक घटना त्यांनी सांगितली की, एका महिलेचे कपडे पुलाच्या लोखंडी रॉडमध्ये अडकले. ती लटकत होती. जवळच्या काही मच्छिमारांनी तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि तिला वाचवले. गावकऱ्यांनी वाचवलेल्या बहुतेक लोकांनी कर्ज आणि कौटुंबिक वाद हे आत्महत्येचे कारण असल्याचे सांगितले. महिपाल नावाच्या आणखी एका ग्रामस्थाने सांगितले की, नदीत तरंगणारे मृतदेह पाहणे खूप दुःखद आहे. दिवसा अनेकांचे लक्ष असते म्हणून काही लोक रात्री पुलावरून उडी मारतात. महिपालने सांगितले की त्याने आतापर्यंत २० जणांना वाचवले आहे.
काही लोक आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती देतात. त्यांनी सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्य पोलिसांना माहिती देतात. पोलिस त्यांचे फोटो आणि माहिती ताबडतोब व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर करतात. नवीपेट पोलिस स्टेशनच्या सहकार्याने काम करून अनेकांचे जीव वाचले आहेत. पोलिसांना माहिती मिळताच ते गावकऱ्यांना सतर्क करतात आणि लगेचच शोध सुरू होतो, असे पी. विनोद नावाच्या आणखी एका ग्रामस्थाने सांगितले.
आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांनी नंतर त्यांना वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानल्याचे स्थानिक लोक सांगतात. महाराष्ट्रातील एका महिलेला यमचा येथील लोकांनी वाचवले होते. नंतर तिने बचावकर्त्यांना तिच्या लग्नात आमंत्रित केले होते. कौटुंबिक वादामुळे टोकाचे पाऊल उचललेल्या एका वृद्धाला रोखण्यात आले होते. नंतर, त्याने त्याच्या नातेवाईकांशी समेट केला. एका गावकऱ्याने सांगितले की, तो आता त्याच्या कुटुंबासह आनंदाने राहतो आणि अलीकडेच त्याला वाचवणाऱ्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. या गावातील लोकांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. ते स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवतात.