

Love marriage horror Telangana
सूर्यापेट: तेलंगणातील सूर्यापेट शहरात कौटुंबिक वादातून पतीने भरदिवसा आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात खळबळ माजली आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला तात्काळ अटक केली आहे.
शिरीषा (रा. जग्गय्यापेट, आंध्र प्रदेश) असे मृत महिलेचे नाव असून मणीदीप (रा. कोदाड, तेलंगणा) असे आरोपी पतीचे नाव आहे. या दोघांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असताना, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत घरगुती वाद होत होते. शिरीषाने छळाला कंटाळून अलीकडेच पोलिसात धाव घेत संरक्षणाची मागणी केली होती. पत्नीने पोलिसात तक्रार केल्याचा राग मणीदीपच्या मनात होता आणि याच रागातून त्याने हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीषा पोलीस स्टेशन परिसराजवळ आली असता मणीदीपने तिला अडवले. लपवून आणलेल्या सुऱ्याने तिच्यावर एकामागून एक वार केले. वर्दळीच्या ठिकाणी अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. गंभीर जखमांमुळे आणि अतिरक्तस्रावामुळे शिरीषा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळली.
हा प्रकार घडताच ऑटो स्टँड परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक दुकानदार आणि प्रवाशांनी आरोपी मणीदीपला रोखण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. मात्र, शिरीषाला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यापूर्वीच तिचा जागीच मृत्यू झाला होता.
स्थानिक पोलीसांनी स्पष्ट केले आहे की, "हा हल्ला पूर्व नियोजित असल्याचे दिसून येत आहे. आरोपी हत्येच्या तयारीतच आला होता. आम्ही त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे."