

Crime News
स्टॉकहोम: आपल्याच पत्नीला तब्बल १०० पेक्षा जास्त पुरुषांना विकून तिला वेश्याव्यवसायासाठी भाग पाडल्याचा एक धक्कादायक प्रकार स्वीडनमध्ये उघडकीस आला होता. पतीने पैशांच्या हव्यासापोटी आपल्या हतबल पत्नीचा छळ करून तिला १२० पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर पतीला अटक केली आहे. त्याची सुनावणी १३ एप्रिल पासून सुरू होणार आहे.
पीडित महिलेने ऑक्टोबर महिन्यात उत्तर स्वीडनमधील पोलिसात ६२ वर्षीय पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपी हा 'हेल्स एंजल्स' या मोटरसायकल क्लबचा माजी सदस्य आहे. त्याने आपल्या पत्नीच्या अंमली पदार्थांच्या व्यसनाचा फायदा घेत तिला जाळ्यात ओढले. तो तिला अंमली पदार्थ पुरवत असे आणि त्या बदल्यात तिला देहविक्री करण्यास भाग पाडत असे. ११ ऑगस्ट २०२२ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अनेक परुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती केल्याचे तक्रारीत पत्नीने म्हटले आहे.
आरोपी पती केवळ पत्नीला विकून थांबला नाही, तर तो एखाद्या 'दलाला'प्रमाणे काम करत होता. त्याने पत्नीसाठी ऑनलाईन जाहिराती तयार केल्या होत्या. इतकेच नव्हे तर, जास्त पैसे कमवण्यासाठी त्याने पत्नीला ऑनलाईन लैंगिक कृत्ये करण्यासही प्रवृत्त केले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १२० संशयित ग्राहकांची ओळख पटवली असून २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या खटल्याची सुनावणी १३ एप्रिल पासून सुरू होणार आहे.
या प्रकरणाची तुलना फ्रान्समधील 'गिझेल पेलिकॉट' या फ्रेंच महिलेच्या प्रकरणाशी केली जात आहे; तिचा पती डॉमिनिक पेलिकॉट याला २०२४ मध्ये २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने स्वतः कबूल केले होते की, तो अनेक वर्ष आपल्या पत्नीला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि त्या काळात अनेक पुरुषांना बोलावून तिच्यावर बलात्कार करायला लावायचा.