

रविवारी तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील मक्तमदारम गावात ५ वर्षांच्या एका मुलीचा कारमध्ये अडकून गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, खेळताना ही मुलगी कारमध्ये गेली आणि अनावधानाने आतून बंद झाली.
सायबराबाद पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव अयकारी अक्षया (वय ५) असून, ती सकाळी चर्चमधून परतल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत घरी आली होती. यानंतर तिचे वडील यादय्या यांनी घरासमोर कार पार्क केली होती. कार लॉक न करता ते इतर कामासाठी बाहेर गेले.
दरम्यान, अक्षया तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळताना कारमध्ये गेली आणि अडकली. पोलिसांनी सांगितले की ती अंदाजे चार ते पाच तास कारमध्ये अडकलेली होती. कडक उन्हामुळे कारमध्ये उष्माघात झाल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांचे प्राथमिक निरीक्षण आहे. तिच्या मृतदेहावर उष्णतेचे काही स्पष्ट चिन्हेही आढळली. मुलीच्या आईला ती कारमध्ये गेली असल्याची कल्पनाही नव्हती.
ही घटना एकटी नाही. याआधी १४ एप्रिल रोजी चेवल्ला भागात दोन लहान मुलांचे कारमध्ये अडकून गुदमरून निधन झाले होते. ही मुलेही घराबाहेर खेळत असताना कारमध्ये गेली आणि अडकली होती.
सातत्याने अशा घटनांमुळे सायबराबाद पोलिसांनी बुधवारी जनतेसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना “लॉक करण्यापूर्वी पाहा” (Look Before You Lock) ही सवय लावण्याचे आवाहन केले आहे.
सूचनेत पुढील बाबींकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे:
कार लॉक करण्यापूर्वी सर्व जागा तपासा.
मुलांना कधीही एकटं कारमध्ये किंवा आजूबाजूला सोडू नका – अगदी काही वेळासाठीसुद्धा नाही.
कारच्या चाव्या मुलांपासून दूर ठेवा.
मुलांना कार खेळण्यासाठी योग्य जागा नाही हे शिकवा.
कार पार्क केल्यानंतर पुन्हा एकदा तपासणी करा की कोणतेही मूल किंवा पाळीव प्राणी आत नाही ना याची खात्री करा.
पोलिसांचे आवाहन:
"अशा घटनांना टाळता येऊ शकते चला, आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी जबाबदारीने वागूया," असे आवाहन पोलिसांनी केले आहे.