

डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आपल्या वादग्रस्त विधान आणि निर्णयामुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांनी जगभरातील देशांवर लादलेल्या आयात शुल्क अर्थात टॅरिफ लागू करण्याचा निर्णयाने सर्वत्र खळबळ माजली असतानाच, आता त्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असणार्या ॲपलला कंपनीचे सीईओ टिम कुक यांना भारतात उत्पादन वाढवू नये, असा सल्ला दिला आहे.
'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, दोहा येथे एका व्यावसायिक कार्यक्रमानिमित्त डोनाल्ड ट्रम्प आणि ॲपलचे सीईओ टिम कुक यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प कुक यांना म्हणाले की, “आम्हाला तुम्ही भारतात व्यवसाय वाढवावा यामध्ये रस नाही. ते स्वतःची काळजी घेऊ शकतात, ते खूप चांगले काम करत आहेत. ॲपल कंपनी आपले उत्पादन अमेरिकेत वाढवेल. दरम्यान, भारताने अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याची धमकी दिल्यानंतर काही दिवसांतच ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा अजूनही सुरू आहेत. वाटाघाटी सुरू आहेत आणि दोन्ही देश करारांवर पोहोचण्यासाठी काम करत आहेत. असे असताना दोहा येथील भाषणात ट्रम्प म्हणाले की भारताने अमेरिकन वस्तूंवरील कर रद्द करण्याची ऑफर दिली आहे. ते आमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यास तयार आहेत. इतर देशांमधून भारतात येणाऱ्या वस्तूंवर खूप जास्त कर आहे. त्यामुळे भारतात अमेरिकन वस्तू विकणे कठीण आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. भारताने अमेरिकन वस्तूंवरील कर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारताला आयात शुल्काबाबत करार व्हावा अशी आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
आयफोन उत्पादक कंपनी ॲपलला भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन करायचे आहे; परंतु चीनबाहेर उत्पादन वाढवण्याच्या कंपनीच्या योजनेवर ट्रम्प खूश नाहीत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या विधानामुळे भारतातील ॲपलच्या योजनांमध्ये अडथळा येऊ शकतो, असे मानले जात आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस बहुतेक आयफोन भारतात बनवले जावेत अशी ॲपलची इच्छा आहे. यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी होईल. सध्या, ॲपल त्यांचे बहुतांश आयफोनची चीनमध्ये निर्मिती हाेते. ॲपल अमेरिकेत कोणतेही स्मार्टफोन बनवत नाही.
भारतात बनवलेले बहुतेक आयफोन फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या प्लांटमध्ये तयार केले जातात. टाटा ग्रुपची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपनी देखील ॲपल कंपनीची एक प्रमुख पुरवठादार आहे. टाटा आणि फॉक्सकॉन दक्षिण भारतात नवीन प्लांट बांधत आहेत आणि उत्पादन क्षमता वाढवत आहेत. मार्चपर्यंतच्या म्हणजे मागील १२ महिन्यांत ॲपलने भारतात २२ अब्ज डॉलर्सचे आयफोन बनवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात सुमारे ६०% वाढ झाली आहे.