

पुढारी ऑनलाईन डेस्क
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Telangana Chief Minister Revanth Reddy) यांनी शुक्रवारी निवेदन जारी करत सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) बिनशर्त माफी मागितली. बीआरएस नेत्या के. कविता (BRS leader K Kavitha) यांना जामीन मिळाल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर रेवंत रेड्डी यांनी टिप्पणी केली होती की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसने भाजपच्या विजयासाठी काम केले ही एक वस्तुस्थिती आहे. बीआरएस आणि भाजपमध्ये झालेल्या समझोत्यामुळे के. कविता यांना जामीन मिळाल्याचीही चर्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मनीष सिसोदिया यांना १५ महिन्यांनंतर जामीन मिळाला आणि अरविंद केजरीवाल यांना अद्याप जामीन मिळालेला नसताना के. कवितांना पाच महिन्यांत जामीन मिळाल्याबद्दल रेवंत रेड्डी यांनी शंका उपस्थित केली होती.
त्यांच्या या वक्तव्यावरुन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले होते की न्यायव्यवस्था विधिमंडळाच्या क्षेत्रात हस्तक्षेप करत नाही आणि हाच नियम विधिमंडळालाही लागू होतो. त्यावर आता रेवंत रेड्डी यांनी न्यायालयाची माफी मागितली आहे.
X वरील एका पोस्टमध्ये रेड्डी यांनी म्हटले आहे की, "मला भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल सर्वोच्च आदर आणि पूर्ण विश्वास आहे. २९ ऑगस्ट २०२४ रोजीच्या काही प्रेस रिपोर्ट्समध्ये माझ्या हवाल्याने दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये, मी न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे चित्र उभे झाले.''
त्यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांचा राज्यघटनेवर आणि त्याच्या नीतिमूल्यांवर ठाम विश्वास आहे आणि न्यायपालिका सर्वोच्च स्थानी आहे. "मी पुन्हा सांगतो की माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. प्रेस रिपोर्ट्समधील माझ्या विधानांबद्दल मी बिनशर्त दिलगिरी व्यक्त करतो. माझा भारताच्या राज्यघटनेवर आणि त्याच्या नीतिमूल्यांवर ठाम विश्वास आहे. माझ्या मनात न्यायपालिकेबद्दल सर्वोच्च आदर आहे आणि काम राहील,” असे ते पुढे म्हणाले.
बीआर गवई, न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर त्यांना जोरदार फटकारले आणि एक घटनात्मक पदाधिकारी अशा प्रकारे बोलत असल्याची टिप्पणी केली. न्यायालयाने रेवंत रेड्डी यांच्या वकिलाला सांगितले की त्यांनी आज सकाळी काय म्हटले ते वाचावे.