नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाच्या धक्क्यातून पक्ष सावरत नाही तोच पक्षाचे दोन राज्यसभा खासदार मोपीदेवी वेंकटरामन राव आणि बीधा मस्तान राव यादव यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनीही त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राज्यसभा सचिवालयाने ही माहिती दिली आहे. राजिनामा दिलेले दोन्ही खासदार तेलगू देसम पक्षात सामील होण्याची शक्यता आहे.
यामध्ये वेंकटरामन पुन्हा एकदा तेलगू देसम पक्ष्याच्या चिन्हावर राज्यसभेवर जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर मस्तान यांनी बिनशर्त पक्षात येण्याचे मान्य केले आहे. चंद्राबाबू नायडूंसोबतच्या घनिष्ठ संबंधांमुळे मस्तान आंध्रच्या राजकीय वर्तुळात ओळखले जातात. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे आणखी सहा खासदार राजीनामे देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राज्यसभेत एनडीएला आणखी बळ मिळेल. नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला होता. १७५ पैकी केवळ ११ जागा त्यांना जिंकता आल्या. तेलगू देसम पक्ष, जनसेना पक्ष आणि भाजप युतीने १६४ जागा जिंकत सत्ता मिळवली.
वायएसआर काँग्रेसच्या खासदारांनी राजिनामे दिल्यानंतर पुन्हा राज्यसभेत खासदार निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. अशा परिस्थितीत त्यांचे विद्यमान खासदार सत्ताधारी तेलगू देसम पक्षाकडून आणखी एक टर्म मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आंध्र प्रदेशातील ११ खासदार राज्यसभेवर निवडून आले आहेत. सध्या हे सर्व खासदार वायएसआर काँग्रेसचे आहेत.