

Crime against women
भोपाळ: लग्न समारंभात ओळख झाल्यानंतर एका २४ वर्षीय एमबीए विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २९ वर्षीय इंजिनिअरला अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि संशयीत आरोपीची पहिली भेट जून २०२५ मध्ये तिच्या मोठ्या भावाच्या लग्नात झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला. मात्र, ऑगस्ट २०२५ मध्ये पीडितेने त्याच्याशी असलेले संबंध तोडून त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. यामुळे संतापलेल्या आरोपीने आत्महत्येची धमकी देऊन तिला भेटण्यासाठी विवश केले.
सप्टेंबर २०२५ मध्ये आरोपीने पीडितेवर अत्याचार केले आणि या कृत्याचे छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर शारीरिक शोषण केले. याला वैतागलेल्या पीडितेने मार्च महिन्यात त्याला विरोध केला, तेव्हा त्याने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
अखेर पीडितेने हिंमत दाखवून रविवारी अशोक गार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे.