पुढारी ऑनलाईन डेस्क: वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी असलेली प्रवेश परीक्षा NEET वादाच्या भोवऱ्यात असतानाच गुजरातमधील गोध्रा येथे पोलिसांनी एक रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये NEETच्या उत्तरपत्रिका शिक्षक सोडवून देत असल्याचे उघडकीस आले आहे.
यात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये शिक्षक तुषार भट, शाळेचे प्राचार्य पुरुषोत्तम शर्मा, आणि एका शैक्षणिक सल्लागार कंपनीचे प्रमुख पुरुषोत्तम रॉय यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख हिमांशु सोळंखी यांनी दिली आहे.
तुषार भट यांच्या मोबाईलमध्ये ३० विद्यार्थ्यांचे फोननंबर आणि कारमध्ये ७ लाख रुपये मिळाले आहेत. तर रॉय यांच्याकडून २ कोटी ३० लाख रुपयांचे चेक जप्त करण्यात आले आहेत. या चेकवर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सह्या आहेत. ही बातमी हिंदुस्थान टाइम्सने दिली आहे.
या प्रकरणात विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोरी सोडण्यास सांगण्यात आले होते, त्यानंतर यावर शिक्षक उत्तरे लिहीत होते. हा प्रकार जलाराम स्कूल या शाळेत उघडकीस आला आहे. रॉय याने या विद्यार्थ्यांची ओळख भट याच्याशी करून दिली. भट हा फिजिक्सचा शिक्षक आहे तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा तो या केंद्रावरील अधिक्षक आहे. रॉय याच्याकडे असलेल्या चेकवर विद्यार्थ्यांच्या पालकांचा सह्या आहेत.
हेही वाचा