नांदेड, पुढारी वृत्तसेवा : 'नीट' परीक्षेमध्ये झालेली पेपरफुटी आणि निकालातील गोंधळप्रकरणी संपूर्ण देशभरात गाजत आहे. या पार्श्वभुमीवर 'नीट'ची तयारी करत असेलेले विद्यार्थी संतप्त झाले आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर परिसरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी 'आमचे भविष्य वाचवा…' अशा घोषणा देत शुक्रवारी (दि.15) एल्गार मोर्चा काढून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले.
भाग्यनगर परिसरातून निघालेला एल्गार मोर्चा आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आला. या नंतर विद्यार्थ्यांनी आणि आयोजकांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहे. या मोर्चामध्ये नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थिनीही आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या दिसून आल्या. प्रत्येकाच्या हातामध्ये फलक होते. त्यावर 'नीट'ची परीक्षा पुन्हा घ्या', 'शिक्षण व्यवस्था ऑक्सिजनवर', 'आम्हाला न्याय हवा', 'माझे भविष्य वाचवा', 'पैसेवाल्यांचा खेळ होतो मात्र सर्व सामान्यांचा जीव जातो', 'नीट'ची परीक्षा देशपातळीवर पुन्हा एकदा नव्याने निपक्षपाती घ्यावी' अशी घोषवाक्ये परिसरात घुमत होती.
सद्यस्थितीत 'नीट'ची परीक्षा एनटीए (नॅशनल टेस्टींग एजन्सी) द्वारे घेतली जाते. परंतु, एनटीए अंतर्गतच घोटाळा झाल्यामुळे विद्यार्थ्यांची या परीक्षेवरील विश्वासार्हता मोडीस निघालेली आहे. पूर्वी ही परीक्षा सीबीएसई (सेंट्रल बोर्ड आफ सेकंडरी एज्युकेशन) द्वारे विश्वासार्ह पद्धतीने घेतली जात होती. त्यामुळे इथून पुढे ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी 'सीबीएसई' द्वारेच घेण्यात यावी, अशी भावनाही यावेळी 'नीट'ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या एल्गार मोर्चातून व्यक्त केली आहे.
यावेळी एल्गार मोर्चातील सहभागी विद्यार्थ्यांना नांदेड ग्रामीण जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष बालाजी गाडे पाटील, प्रोफेशनल ट्युटोरिअल असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष प्रा. आर. बी. जाधव, जिल्हाध्यक्ष प्रा. राज आटकोरे, प्रा. डॉ. नागेश कल्याणकर, प्रा. साईकिरण सलगरे, केदार पाटील साळुंखे, डॉ. अब्दुल बाखी, डॉ. विश्वास बालाजीराव कदम आदींनी विद्यार्थ्यांना आयटीआय चौकात मार्गदर्शन केले.
हेही वाचा :