नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या "नीट" परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याच्या मुद्यावरून राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नीट परीक्षेच्या गोंधळावरून विद्यार्थी व पालकांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश देऊनही देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. विद्यार्थी संघटनांनी यावरून रान उठविले आहे. संसदेतही हा मुद्दा गाजणार असल्याने राजकारण तापले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच ४ जून रोजी नीट परीक्षेचाही निकाल जाहीर झाला होता. या निकालात विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात ग्रेस मार्क दिल्याचे आढळून आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला. नीट परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्याचाही आरोप झाल्याने आंदोलन भडकले. याप्रकणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्या आहेत.
दिल्लीतील केंद्रीय शिक्षण मंत्रालय, ओखला येथील एनटीए मुख्यालय, जंतर मंतर अशा ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. 'एसएफआय' संघटनेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयासमोर आंदोलन केले. नीट परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना जाब विचारला.
"अभाविप"ने एनटीएच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. नीट पेपरफुटीची सीबीआय़ चौकशी करण्याची मागणी अभाविपच्या राष्ट्रीय सचिव शिवांगी खरवाल यांनी केली आहे. "एनएसयूआय' ने १३ जून रोजी जंतर मंतरवर मोठे आंदोलन करुन संपूर्ण परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे, नांदेड आदी शहरांमध्येही विद्यार्थांनी आंदोलन केले.
उत्तरप्रदेशच्या कानपूर, लखनौ, वाराणसीसह इतर ठिकाणीही आंदोलनाचा भडका उडाला आहे. नीट परीक्षा रद्द करुन फेरपरीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघात बनारस हिंदू विद्यापीठाच्या गेटसमोर विद्यार्थ्यांनी ११ जून रोजी आंदोलन करुन नीट पेपरफुटीच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
झारखंडमधील रांची, बिहारच्या पाटणासह पश्चिम बंगालच्या कोलकातामध्येही विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय लोकशाही विद्यार्थी संघटनेने (एआयडीएसओ) कोलकत्ता येथील उच्च शिक्षण मुख्यालयाजवळ १३ जून रोजी आंदोलन केले आहे. हरियाणाच्या सोनीपत, राजस्थानच्या जयपूर, अजमेरमध्येही विद्यार्थी,पालक रस्त्यावर उतरले आहेत.
नीट परीक्षा २०२४ च्या निकालात ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले. हा आकडा दरवर्षीच्या तुलनेत खुप जास्त आहे. १५६३ विद्यार्थ्यांना एनटीएने अकारण ग्रेस गुण दिले आहेत. काही परीक्षा केंद्रांवर पेपरफुटी झाल्याचा आरोप आहे. बिहारच्या पाटण्यात काही आरोपींना अटक झाली. त्यामुळे देशभरात आंदोलन भडकले आहे. काँग्रेसने या मुद्यावरुन मोदी सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे.