

Tamil Nadu Temple Accident
तुतिकोरीन: मंदिरात गेल्यानंतर माकडांना खायला देणे एका नवविवाहित तरूणीच्या जीवावर बेतलं. केळी खाऊ घालत असताना अचानक माकडांनी वेढल्याने घाबरलेली तरूणी पळून जात होती, यावेळी टेकडीवरून १२० फूट खोल दरीत पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी तामिळनाडूमधील तुतीकोरीन जिल्ह्यातील कलुगुमलाई येथील उच्ची पिल्लयार मंदिरात ही घटना घडली.
अनिता (वय २४) असे मृत महिलेचे नाव आहे. कोविलपट्टी येथील दक्षिण थिट्टनगुलम येथे राहणाऱ्या सुरेश या परदेशात कार्यरत असलेल्या तरुणाशी तिचा महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर देवदर्शनासाठी हे नवविवाहित जोडपे शुक्रवारी संध्याकाळी कलुगुमलाई येथील टेकडीवर असलेल्या उच्ची पिल्लायर मंदिरात गेले होते.
शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अनिता मंदिराच्या परिसरात असलेल्या माकडांना केळी खायला देत होती. त्याच वेळी अचानक माकडांच्या एका मोठ्या घोळक्याने तिला चारही बाजूंनी वेढले. माकडांना पाहून अनिता प्रचंड घाबरली आणि तिथून पळू लागली. मात्र, याच धावपळीत तिचा पाय घसरला आणि ती थेट १२० फूट खोल दरीत कोसळली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशामक दल आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीतून अनिताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कलुगुमलाई पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोविलपट्टी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. लग्नाचा आनंद अद्याप ओसरलाही नव्हता, तोच तिच्यावर काळाने घाला घातल्याने, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.