

Suvendu Adhikari PA Murder Case
कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी या हत्येचा तपास करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आणि 'एसटीएफ'ने मिळून एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते. बक्सरचे पोलीस अधीक्षक शुभम आर्या यांनी पश्चिम बंगालच्या पथकाने जिल्ह्यात छापे टाकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अखेर पोलीस बहुचर्चित हत्या प्रकरणातील मारेकर्यांपर्यंत कसे पोहचले याबाबत जाणून घेवूया....
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यानंतर ६ मे रोजी रात्री १० च्या सुमारास चंद्रनाथ रथ घरी परतत असताना त्यांच्या एसयूव्हीला (SUV) अडवून हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांचा चालक बुद्धदेव बेरा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली सिल्व्हर रंगाची कार गोळीबाराच्या काही वेळ आधी टोल नाक्यावरून गेली होती. यावेळी कारमधील व्यक्तींनी टोलचे पैसे UPI द्वारे भरले होते. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "UPI व्यवहाराच्या मदतीने तपासाधिकाऱ्यांना एका संशयिताशी संबंधित मोबाईल क्रमांक मिळाला. टोल प्लाझावरील CCTV फुटेजमध्ये संबंधित वाहन आणि त्यातील व्यक्तींचे स्पष्ट फोटो कैद झाले होते. या डिजिटल पुराव्यांनी आणि CCTV फुटेजमुळे हत्येपूर्वी संशयितांच्या हालचालींचा क्रम लावणे पोलिसांना शक्य झाले.
तपासाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या विशेष कृती दलाने (STF) विशाल श्रीवास्तव, मयंक मिश्रा आणि विकी मौर्य या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांच्या अटकेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. विशाल श्रीवास्तव याच्यावर एकट्या बक्सरमध्ये हत्या आणि लुटीसह २२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
या हत्येचा तपास करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आणि STF ने मिळून एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते. तपासाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी गोळीबारानंतर चांदीच्या रंगाची कार सोडून दिली. यानंतर लाल रंगाची कार तसेच मोटारसायकलवरून पळ काढला. पोलिसांनी या गुन्ह्याशी संबंधित दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पकडले जाऊ नये म्हणून सर्व वाहनांच्या नंबर प्लेट्स बनावट होत्या आणि इंजिन व चॅसिस नंबरशीही छेडछाड करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
रथ यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबारात 'ग्लॉक ४७एक्स' (Glock 47X) या ऑस्ट्रियन बनावटीच्या अत्याधुनिक पिस्तुलचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतात गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अशा प्रकारचे शस्त्र क्वचितच पाहायला मिळते. या गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल भारतात सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे या गुन्ह्यामागे कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा सीमापार कनेक्शन आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.